वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकेत अवैध प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांना घेऊन येणारे विमान शनिवारी अमृतसरला उतरले. मात्र या विमानातील शीख स्थलांतरितांना चुकीची आणि वाईट वागणूक दिल्याचा आरोप शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) केला. शीख स्थलांतरितांना पगडी घालण्यास परवानगी देण्यात आली नाही, असा आरोप करत समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेसनेही यावर टीका केली असून नरेंद्र मोदी हे कमकुवत पंतप्रधान असल्याची टीका केली.

शीख धर्मामध्ये पगडीला खूप महत्त्व आहे. मात्र तरीही शीख स्थलांतरितांना पगडी घालण्यास परवानगी देण्यात आली नाही. हा शीख धर्माचा अवमान असल्याची टीका करत एसजीपीसीने अमेरिकी अधिकाऱ्यांचा निषेध केला. एसजीपीसी लवकरच डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा मांडतील, असे एसजीपीसीचे सरचिटणीस गुरचरण सिंग ग्रेवाल म्हणाले.

दरम्यान, शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांनी या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे प्रकरण अमेरिकन अधिकाऱ्यांकडे मांडण्याची विनंती परराष्ट्र मंत्रालयाला केली.

अमेरिकेत अवैध प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांच्या दोन तुकड्या शनिवारी आणि रविवारी अमृतसरमध्ये दाखल झाल्या. शनिवारी ११२ आणि रविवारी ११६ भारतीयांना घेऊन आणणारे विमान दाखल झाले. विमानतळावर उतरल्यानंतर एसजीपीसीच्या स्वयंसेवकांनी निर्वासितांना मदत करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अनेक शिख निर्वासितांनी त्यांना अमेरिकी अधिकाऱ्यांनी पगडी घालण्यास परवानगी दिली नसल्याचे सांगितले. त्यावेळी एसजीपीसीने पगडी व जेवण देण्यात आले.

काँग्रेसची टीका

अमेरिकेतून भारतात आणल्या जात असलेल्या स्थलांतरितांना गैरवागणूक दिली जात असल्याबाबत काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. आधी स्थलांतरितांना हाता-पायात बेड्या घालून आणण्यात आले. आता मात्र शिख स्थलांतरितांना पगडी न परिधान करताच यावे लागले, हे चुकीचे असल्याचे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी दौऱ्यात ट्रम्प यांची भेट घेतली. या वृत्ताचा संदर्भ देत रमेश म्हणाले की, अमेरिकेतील भारतीय नागरिकांना ज्या पद्धतीने हद्दपार केले जात आहे, त्याबाबत आपल्या देशाचा आक्रोश पंतप्रधानांनी त्यांच्या ‘चांगल्या मित्रा’कडे पोहोचवला नाही, हे यातून स्पष्ट होते. केवळ भेकड लोकच ५६ इंचांच्या छातीची बढाई मारतात, असे रमेश म्हणाले. मोदी हे कमकुवत पंतप्रधान असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.

Story img Loader