एअर इंडिया बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेले शीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील मेट्रो व्हँकुव्हर परिसरात ही घटना घडली. एअर इंडियाच्या विमान कनिष्कवर १९८५ मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोट प्रकरणात मलिक हे आरोपी होते. स्फोटामध्ये ३२९ लोकांना आपला जीव गमवावा लागला. हे विमान कॅनडाहून दिल्लीला निघाले होते. मात्र रिपुदमन सिंग मलिक यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
मलिक, इंद्रजीत सिंग रयत आणि अजयब सिंग बागरी हे एअर इंडियाच्या सम्राट कनिष्क या बोईंग ७४७ विमानात झालेल्या स्फोटातील तीन मुख्य आरोपी होते. मलिक आणि बागरी यांच्यावर ३२९ जणांच्या हत्येच्या गुन्ह्यांचा आरोप होता. परंतु साक्षीदार बनवण्यात आलेल्या रयत याने सांगितले की त्याला कटाचा तपशील किंवा त्यात सहभागी असलेल्यांची नावे आठवत नाहीत.
बॉम्बस्फोटानंतर भारत सरकारने त्याला काळ्या यादीत टाकले होते. मात्र २००५ मध्ये पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मलिक यांना २०२० मध्ये सिंगल एंट्री व्हिसा आणि २०२२ मध्ये मल्टिपल एंट्री व्हिसा देण्यात आला होता. मलिक यांनी या वर्षी मे-जूनमध्ये भारताचा दौरा केला होता. या काळात त्यांनी भारतातील आंध्र प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्रात अनेक तीर्थयात्रा केल्या.
पंतप्रधान मोदींचे कौतुक करणारे पत्र
जानेवारी महिन्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. यासोबतच त्यांनी खलिस्तानची मागणी सोडून देण्यासाठी खुले पत्रही लिहिले आहे. “तुमच्या सरकारने शीख समुदायासाठी अशी अनेक पावले उचलली आहेत. अशा अभूतपूर्व आणि सकारात्मक पावलांसाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत,” असे मलिक यांनी पत्रात म्हटले होते.
हत्येबाबत अनेक तर्कवितर्क
मलिक यांच्या हत्येने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा हल्ला त्यांच्या मागील घडामोडींशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “मला विश्वास आहे की हे प्रकरण त्यांच्या राजकीय प्रकरणांशी संबंधित आहे.”