पीटीआय, ओटावा
कॅनडाच्या एडमंटनमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीसह त्याच्या ११ वर्षीय मुलाची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. येथे गुन्हेगारी टोळय़ांकडून हिंसाचाराचे प्रकार वाढले आहेत. या हिंसाचारात ठार झालेला ४१ वर्षीय हरप्रीतसिंग उप्पल हा कॅनडातील संघटित गुन्हेगारी क्षेत्रातील कुख्यात गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एडमंटन पोलिसांचे प्रभारी अधीक्षक कॉलिन डर्कसन यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, उप्पल आणि त्यांच्या मुलाला गुरुवारी दुपारी एका पेट्रोल पंपाच्या बाहेर ठार करण्यात आले. गोळीबाराच्या वेळी उप्पल यांच्या मुलाचा मित्रही मोटारीत होता. मात्र, त्याला या हल्ल्यात कोणतीही दुखापत झाली नाही.
हेही वाचा >>>मृत्यू, काहीजण बेशुद्ध तर अनेकजण जखमी, सुरत रेल्वेस्थानकावर धक्कादायक प्रकार
डर्कसन यांनी सांगितले, की हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा त्यांना या मोटारीत मुले आहेत, हे माहीत होते का, हे पोलीस सांगू शकणार नाहीत. मात्र, या मोटारीतील एक मुलगा उप्पलचा मुलगा आहे हे समजल्यानंतर हल्लेखोरांनी त्याला ठार करण्यासाठीच जाणूनबुजून त्याच्यावरही गोळय़ा झाडल्या. गुन्हेगारी विश्वातही एक काळी लहान मुलांची हत्या करणे वज्र्य होते. गुन्हेगारी टोळय़ा बालहत्या करत नव्हते. मात्र, आता ही मर्यादाही ओलांडली जात आहे. पोलिसांनी उप्पलच्या मुलाचे नाव जाहीर केले नाही. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. ‘सीबीसी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार उप्पलवर कोकेन बाळगणे आणि त्याच्या तस्करीसह अनेक आरोप आहेत. या खटल्याची सुनावणी एप्रिल २०२४ पासून सुरू झाली होती.