उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उत्तराखंड मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोगद्यात अडकलेले कामगार पुढच्या दोन तासांत बाहेर येतील. एनडीआरएफच्या पथकांसह इतरही बचाव पथकं रात्रभर खोदकाम करत आहेत. सर्व कामगार सुरक्षित असल्याची चित्रफीत मंगळवारी ‘एनडीएमए’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) जारी केली होती. सर्व कामगार सुखरूप असून आता त्यांच्या सुटकेसाठी नवी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बचाव पथकांनी मंगळवारपासून आडव्या दिशेने खोदकाम सुरू केलं आहे.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी एकाच वेळी पाच आघाड्यांवर प्रयत्न चालू आहेत. कामगार बोगद्यात अडकल्यानंतर उभ्या दिशेने खोदकाम करण्यास सुरुवात करण्यात आली होती. परंतु, उभं खोदकाम करताना खडक लागत असल्यामुळे आडव्या दिशेने खोदण्यावर भर दिला जात आहे. या बचाव मोहीमेचा आजचा १२ वा दिवस आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार उत्तरकाशीतल्या दुर्घटनाग्रस्त सिल्क्यारा बोगद्यात रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आल्या आहेत. यासह डॉक्टरांचं एक पथकही तैनात करण्यात आलं आहे. कामगारांना बाहेर काढल्यानंतर लगेचच त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच आवश्यकता असल्यास या कामगारांना जवळच्या रुग्णालयात नेलं जाईल.
बोगद्याच्या बाहेर नॅशनल व्हॅक्सिन व्हॅनदेखील उभी आहे. या व्हॅनचे चालक केशव सजवान आणि शिव सिंह राणा यांनी सांगितलं की, “त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाने इथे उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. व्हॅनमध्ये आवश्यक औषधं आणि इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध आहे.” उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी काही वेळापूर्वी उत्तरकाशीत दाखल झाले आहेत.
हे ही वाचा >> दोन कॅप्टन, दोन जवान शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत मेजरसह अन्य एक जवान जखमी
काश्मीर आणि लडाखला जोडण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या जोजिला बोगद्याचे प्रकल्प प्रमुख आणि बचाव पथकातील सदस्य हरपाल सिंह म्हणाले, पुढच्या काही मिनिटांमध्ये बचाव मोहीम पूर्ण होईल. आतापर्यंत ४४ मीटरपर्यंत एक नलिका खोदण्यात आली आहे. आता केवळ १२ मीटर एवढंच खोदकाम बाकी आहे.