एपी, रोम
इटलीचे माजी पंतप्रधान व अब्जाधीश माध्यम सम्राट सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांचे सोमवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. भ्रष्टाचाराचे आणि चैनीच्या जीवनशैलीचे आरोप असलेल्या बर्लुस्कोनी यांनी इटलीचे पंतप्रधानपद सर्वाधिक काळ भूषवले. गेल्या काही वर्षांपासून ते हृदयविकार आणि कर्करोगाने ग्रस्त होते.
आपल्या ऐषोरामी-चैनीच्या जीवनशैलीमुळे बर्लुस्कोनी अनेकदा वादग्रस्तही ठरले. त्यांच्या मालकीच्या ‘मीडियासेट टेलिव्हिजन नेटवर्क’समूहाने त्यांची हसरी मुद्रा प्रसिद्ध करून, त्यांच्या मृत्यूची बातमी देताना ‘बर्लुस्कोनी हयात राहिले नाहीत’ असे नमूद केले आहे. बर्लुस्कोनी यांना रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी दुसऱ्यांदा शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अनेक वर्षांपासून हृदयविकार, प्रोस्टेट कर्करोगाचा त्रास होता. २०२० मध्ये करोनाग्रस्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बर्लुस्कोनी यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३६ रोजी मिलानमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी कायद्याची पदवी मिळवली होती. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि मिलानच्या बाहेरील परिसरात मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी अनेक निवासी संकुले उभारली.एके काळी सागरी पर्यटन करणाऱ्या जहाजांवर (क्रूज शिप) गाणी गाणाऱ्या बर्लुस्कोनी यांनी आपल्या यशस्वी प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीसाठी आपल्या वाहिनीच्या देशव्यापी जाळय़ाचा आणि अफाट संपत्तीचा वापर केला. ते तीनदा इटलीचे पंतप्रधान झाले. त्यांना आपल्या राजकीय कौशल्यातून इटलीचा जागतिक स्तरावरील प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले, असे दावा त्यांचे समर्थक करतात. मात्र, त्यांच्या विरोधकांच्या मते ते लोकानुनय करणारे नेते होते. त्यांनी स्वत:ला आणि आपल्या व्यवसायाला प्रबळ करण्यासाठी राजकीय शक्तीचा एखाद्या अवजाराप्रमाणे वापर केला. मात्र, तसे करताना त्यांनी इटलीतील लोकशाही यंत्रणा कमजोर केली. २००१-०६ मध्ये बर्लुस्कोनी यांची पंतप्रधानपदाची दुसरी कारकीर्दही गाजली. या काळात इटलीचे पंतप्रधानपद दीर्घकाळ भूषवणारे नेते अशी त्यांची ओळख बनली. तसेच तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्याशी मैत्रीचे संबंध राखत त्यांनी जागतिक स्तरावर आपला प्रभाव वाढवून प्रतिमा उंचावली होती. अलिकडे वयाच्या ८२ व्या वर्षी ते युरोपियन संसदेवर निवडून गेले. गेल्या वर्षी इटालियन सिनेटवरही त्यांची निवड झाली होती.
राजकारण आणि मैत्रीचे किस्से..
बर्लुस्कोनी यांच्या ‘फोर्जा इटालिया’ पक्षाची इटलीच्या विद्यमान पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आघाडी आहे. मेलोनी या कट्टर उजव्या विचारसरणीच्या मानल्या जातात. मात्र, बर्लुस्कोनी यांनी सरकारमधील कोणतेही पद स्वीकारले नव्हते. बर्लुस्कोनींची रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी असलेली मैत्री युक्रेनच्या कट्टर समर्थक मेलोनींना अडचणीची ठरत होती. बर्लुस्कोनींच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना पुतिन यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आणि त्यांना रशियन मद्य ‘व्होडका’ भेट म्हणून पाठवली. त्याची परतभेट म्हणून बर्लुस्कोनी यांनी पुतिन यांना उंची इटालियन मद्य पाठवल्याचे सांगितले होते.