पीटीआय, नवी दिल्ली

दक्षिण भारतात भाजपचा फारसा प्रभाव नसल्याने या क्षेत्रातील राज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात झुकते माप देण्यात आले आहे. दक्षिणेकडील राज्यांतील भाजपच्या सहकारी पक्षांना मंत्रिमडळात स्थान देण्यात आले. आंध्र प्रदेश, तेलंगणातील अनेक खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २५ पैकी २१ जागा जिंकल्या आहेत. त्यात तेलुगु देसम पक्षाचे १६ खासदार आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशातील तेलुगु देसम व भाजपच्या प्रत्येकी दोन खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. तीन वेळा खासदार राहिलेले किंजरापू राम मोहन नायडू यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे, तर पहिल्यांदाच खासदार झालेले डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

हेही वाचा >>>‘नीट-यूजी’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका; निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी

आंध्र प्रदेशात भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. सध्या प्रदेशाध्यक्ष असलेले दग्गुबती पुरंदेश्वरी आणि नरसापुरमचे खासदार भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांना मंत्रीपद मिळाले आहे. रालोआचा घटक पक्ष म्हणून आंध्र प्रदेशात दोन जागा जिंकणाऱ्या जनसेनेला लोकसभेचे उपाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता आहे.

तेलंगणामध्ये १७ पैकी आठ जागा जिंकणाऱ्या भाजपने दोघांना मंत्रीपदाची संधी दिली आहे. बी. संजय आणि जी. किशन रेड्डी यांनी शपथ घेतली. कर्नाटकात भाजपच्या चार खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. मित्रपक्ष जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली. कर्नाटकात रालोआला २८ पैकी १९ जागा मिळाल्या. भाजपने १७ तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) दोन जागा जिंकल्या. केरळमधून भाजपचा खासदार पहिल्यांदाच निवडून आला असून खासदार सुरेश गोपी यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.