Singapore Railway Stuck Due To Heavy Rains : मुंबईत मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा कोलमडून पडते हे आतापर्यंत सर्वज्ञात झालं आहे. २५ सप्टेंबर रोजी अचानक पावसाला सुरुवात झाल्याने मध्य रेल्वेची सेवा जवळपास अडीच ते तीन तास खंडित झाली होती. त्यामुळे ऑफिसमधून घरी जाण्याच्या धावपळीत असलेल्या नोकरदार वर्गाचे हाल झाले. पण ही परिस्थिती फक्त मुंबईतच निर्माण होते असं नाही. तर सिंगापूरमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. तिथेही एका मार्गावरील लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. दि स्ट्रेट टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सिंगापूरच्या इस्ट वेस्ट मार्गावर लोकल सेवा गेल्या २४ तासांहून अधिक काळापासून खंडित झाली आहे. जुरोंग इस्ट आणि बुओना व्हिस्टा एमआरटी स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध नाही. ट्रॅक्शन फॉल्टमुळे ही समस्या निर्माण झाली असून पावसानेही हाहाकार माजवला आहे. त्यामुळे २४ तासांपासून या मार्गावरील सेवा खंडित झाली आहे.
रेल्वेसेवा कोलमडली, पण बससेवा पुरवली
रेल्वे सेवा कोलमडली असली तरीही त्याच मार्गावर मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांनी आता बससेवाचा पर्याय अवलंबिला आहे. रेल्वे सेवा खंडित झाल्याने प्रवाशांनी बससाठी गर्दी केली आहे. प्रवाशांना व्यवस्थित बसमध्ये प्रवेश करण्याकरताही कर्मचाऱ्यांकडून मदत केली जात आहे. बस आणि प्रवाशांच्या रांगांमुळे रस्त्यावर तुफान गर्दी झाली आहे. एका बसमधून जवळपास ९० प्रवासी प्रवास करू शकत आहेत. तसंच, दिव्यांग व्यक्ती आणि विशेष गरजा असलेल्या प्रवाशांकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन आहोत, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
हेही वाचा >> Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेचं प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन, “ट्रेनमध्ये अडकून पडला असाल तर…”
रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने तेथील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून देण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांनंतर ही समस्या पहिल्यांदाच तिथे उद्भवली आहे. परंतु, अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने काळजी घ्यायला हवी, असंही नागरिकांचं म्हणणं आहे.
२०१७ नंतरचा हा सर्वात मोठा रेल्वे व्यत्यय
२०१७ नंतरचा हा सर्वात मोठा रेल्वे व्यत्यय आहे. ७ ऑक्टोबर २०२७ रोजी मुसळधार पावसामुळे ब्रॅडेल आणि बिशन एमआरटी स्थानकांदरम्यान बोगद्यात पूर आला आणि उत्तर-दक्षिण मार्गावरील रेल्वे सेवा २० तासांपेक्षा जास्त काळ बंद पडल्या. सुमारे एक महिन्यानंतर १५ नोव्हेंबर २०१७ रोजी जू कून एमआरटी स्थानकावर ट्रेनच्या धडकेत २८ लोक जखमी झाले. यामुळे पूर्व-पश्चिम मार्गावरील जू कून ते तुआस लिंकपर्यंत रेल्वे सेवा तीन दिवसांसाठी खंडित करण्यात आली होती.