अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्याविरोधात लष्करी कारवाई करण्यासाठी काँग्रेसकडून परवानगी मागून ‘ऐतिहासिक माघार’ घेतली आहे, या शब्दांत तोफ डागून आम्ही कोणत्याही ‘बाह्य़ अतिक्रमणा’ला तोंड देण्यास पूर्ण सज्ज आहोत, या अत्यंत आक्रमक भाषेत सीरियाचे अध्यक्ष बशार अल् असाद यांनी अमेरिकेला, पर्यायाने ओबामा यांना रविवारी थेट आव्हान दिले. असाद यांनी अशा प्रकारे अत्यंत जहरी असे वक्तव्य केल्यामुळे ओबामा आता कोणती पावले उचलतात, याकडे जागतिक समुदायाचे लक्ष लागले आहे.
विविध अतिरेकी संघटना, गट आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांकडून सीरियाला अंतर्गत आक्रमणास तोंड द्यावे लागतच आहे, परंतु त्या आव्हानाबरोबरच कोणत्याही प्रकारच्या बाह्य़ अतिक्रमणाला तोंड देण्यास सीरिया पूर्णपणे सज्ज आहे, असे असाद यांनी ठणकावले आहे. असाद यांनी केलेल्या या वक्तव्यांसंबंधी सीरियाच्या अखत्यारीतील ‘साना’ या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. ‘सीरिया एकामागून एक अशा पद्धतीने विजयाचे उच्चांक गाठत आहे,’ असाही दावा असाद यांनी केला. ओबामा यांच्या निर्णयानंतरअसाद यांनी प्रथमच अत्यंत आक्रमक अशी भाषा वापरून अमेरिकेवर टीकास्त्र सोडले.
सीरियाचे उप-परराष्ट्रमंत्री फैसल मुकदाद यांनीही बराक ओबामा यांच्यावर जोरदार टीकेची तोफ डागून ओबामा हे अत्यंत घिसाडघाईने निर्णय घेणारे, अस्वस्थ आणि गोंधळलेले नेते असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
असाद हिटलरसारखे
असाद हे नाझी हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर आणि इराकचे नेते सद्दाम हुसेन यांच्यासारखेच असल्याची तुलना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी केली. हिटलर आणि सद्दाम या दोघांनीही आपल्याच लोकांविरोधात रासायनिक शस्त्रांचा वापर केला होता आणि आता असाद यांनीही तेच केले असल्यामुळे असाद हे त्यांच्या रांगेत जाऊन बसले असल्याचे ते म्हणाले.
सीरिया सज्ज
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्याविरोधात लष्करी कारवाई करण्यासाठी काँग्रेसकडून परवानगी मागून
First published on: 02-09-2013 at 01:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siriya ready to take on us asad challenges america