उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर झाला. यावेळी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) शेतकऱ्यांना थार गाडीने चिरडलं तेव्हा तुम्ही कोठे होता? असा प्रश्न विचारला. यावर आशीष मिश्राने त्यावेळी आपण कुस्ती पाहायला गेलेलो होतो असं उत्तर दिलं.

कुस्तीचं ठिकाण लखीमपूर हिंसाचारापासून ४-५ किलोमीटर आहे. मात्र, आशीष मिश्राचं मोबाईल लोकेशन हिंसाचार घडला तेव्हा घटनास्थळाच्याच जवळ असल्याचं स्पष्ट झालंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशीष मिश्राने एसआयटीच्या चौकशीत सहकार्य केलं नाही आणि दिशाभूल करणारी उत्तर दिलं. यानंतर त्याला अटक करण्यात आलंय.

कुस्तीच्या ठिकाणाहून आशीष मिश्रा ३ तास बेपत्ता

पोलिसांनी दिलेले जबाब आणि प्रत्यक्ष कुस्तीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर लोक यांनी दिलेल्या माहितीनुसार लखीमपूर हिंसाचार घडला त्या दिवशी आशीष मिश्रा ३ तास कार्यक्रमातून बेपत्ता झाले होते. आशीष मिश्राचं मोबाईल टॉवर लोकेशन देखील याला दुजोरा देत आहे. हिंसाचार घडला तेव्हा आशीष मिश्रा घटनास्थळाच्या परिसरातच असल्याचं स्पष्ट झालंय.

दिशाभूल करणारे जबाब देऊन आशीष मिश्रा गोत्यात

आरोपी आशीष मिश्राने पोलिसांची दिशाभूल करणारे जबाब दिल्यानं तो स्वतःच गोत्यात येताना दिसत आहे. मिश्राच्या सहकाऱ्यांनीही शेतकऱ्यांविरोधात एक पोलीस तक्रार दिलीय. त्यात त्यांनी आशीष मिश्राचा गाडी चालक घटनास्थळावर हजर असल्याचं आणि तेथेच त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. याशिवाय महिंद्रा थार गाडी आंदोलक शेतकऱ्यांना चिरडत गेली तेव्हा ही गाडी चालक चालवत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षदर्शी पोलिसांनुसार तेव्हा गाडी सफेद रंगाचा शर्ट किंवा कुर्ता घातलेला व्यक्ती चालवत होता. चालक हरी ओमचा मृतदेह रुग्णालयात भरती करण्यात आला तेव्हा त्याच्या अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट होता. यावरुन तेव्हा गाडी चालक चालवत नसल्याचंही स्पष्ट झालंय.

३ दिशाभूल करणाऱ्या जबाबांनंतर आरोपी आशीष मिश्राला अटक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशीष मिश्राच्या ३ दिशाभूल करणाऱ्या जबाबांनंतर एसआयटीने त्याला अटक केलं. आरोपी चौकशीत सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हिंसाचारानंतर ५ दिवसांनी आशीष मिश्राला अटक झालीय. याआधी त्याला दोनदा समन्स पाठवण्यात आलं होतं. पहिल्या वेळी तो चौकशीसाठी हजर राहिला नाही. दुसऱ्यांदा तो चौकशीला हजर राहिला.

हेही वाचा : VIDEO: लखीमपूरला जाणाऱ्या भाजपा माजी खासदाराचे केस ओढले, धक्के मारत पोलीस गाडीत घातलं

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मागणीला जोर

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मिश्रा यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केलीय. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “मुलाला अटक आणि तरीही वडील मंत्रिपदावर कायम कसे?” माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह म्हणाले, “आरोपी आशीष मिश्रा उर्फ मोनूला शिक्षा होण्यासाठी मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवलं पाहिजे.”

Story img Loader