कलबुर्गी (कर्नाटक)
कथित लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आणि हासन मतदारसंघाचे खासदार व भाजप-जनता दल (धर्मनिरपेक्ष) युतीचे लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांनी गुरुवारी दिली.
प्रज्वल रेवण्णा सध्या परदेशात असून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर राहण्यासाठी आणखी सात दिवसांची मागणी केली आहे. मात्र, त्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ देण्याची तरतूद नाही, असे परमेश्वरा यांनी सांगितले.
‘‘प्रज्वल रेवण्णा परदेशात गेल्याची माहिती मिळताच लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. आम्ही सर्व बंदरे आणि विमानतळांना लुकआउट नोटीसबद्दल माहिती दिली आहे,’’ असे त्यांनी यांनी पत्रकारांना सांगितले.
समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह ३००० ध्वनीफिती आणि छायाचित्रे याप्रकरणी रेवण्णा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. हासन लोकसभा मतदारसंघातून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आहेत. या जागेसाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाले आहे. गृहमंत्री परमेश्वर पुढे म्हणाले, ‘‘एसआयटी सदस्य रेवण्णा यांना दिलेल्या वेळेबाबत कायदेशीर मत घेत आहेत. २४ तासांपेक्षा जास्त वेळ देण्याची तरतूद नसल्याने एसआयटी त्यांना अटक करण्यासाठी पावले उचलणार आहे. याआधी एका महिलेने प्रज्वल आणि त्याच्या वडिलांविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. ते म्हणाले की, प्रज्वलविरोधात आणखी एका पीडितेने तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा >>> Scandal: “प्रज्ज्वल रेवण्णाला भगवान कृष्णाचाही रेकॉर्ड मोडायचा होता”, काँग्रेसच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान
रेवण्णांचा चालक मलेशियात
बेंगळूरु : कथित लैंगिक शोषणाची चित्रफीत जारी करणारा रेवण्णांचा माजी कार चालक सध्या मलेशियामध्ये आहे. माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी अशा हालचालींमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. चालक कार्तिकने मंगळवारी जारी केलेल्या चित्रफितीमध्ये म्हटले आहे की, त्याने भाजप नेते देवराजे गौडा व्यतिरिक्त इतर कोणालाही कथितरित्या रेवण्णा यांचा समावेश असलेली चित्रफीत आणि छायाचित्रे दिलेली नाहीत. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर प्रज्वल रेवण्णा यांच्याशी संबंधित अश्लील चित्रफीत जारी केल्याचा आरोप करणाऱ्या जनता दल (सेक्युलर) च्या कर्नाटक युनिटचे अध्यक्ष कुमारस्वामी यांनी चालक कार्तिकच्या मलेशिया दौऱ्यामागे शिवकुमार आणि त्यांचा भाऊ आणि काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
जनैतिक पासपोर्ट असल्याने प्रज्वल व्हिसाविना जर्मनीत ; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा खुलासा
नवी दिल्ली : निलंबित जेडी(एस) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या जर्मनीच्या प्रवासासंदर्भात कोणतीही राजकीय मंजुरी मागितली नाही किंवा देण्यात आलेली नाही, असा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) गुरुवारी केला. एमईएचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, राजनैतिक पासपोर्ट धारकांना जर्मनीला जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांची नातू रेवन्ना जर्मनीत असल्याचे समजते. कथित लैंगिक शोषण प्रकरणी जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) हसन खासदार रेवण्णा यांना यापूर्वीच निलंबित केले आहे.‘रेवण्णा यांच्या जर्मनीच्या प्रवासासंदर्भात एमईएकडून कोणतीही राजकीय मंजुरी मागितली गेली नाही किंवा देण्यात आलेली केली गेली नाही,’ असे जयस्वाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रेवण्णांच्या जर्मनीच्या प्रवासाबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
रेवण्णा यांच्यावरील लैंगिक छळाचे आरोप पाहता परराष्ट्र मंत्रालय त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याचा विचार करू शकते का, असे विचारले असता, जयस्वाल यांनी थेट उत्तर दिले नाही. ‘‘कोणत्याही व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करण्याच्या संभाव्य संदर्भात, मी तुम्हाला पासपोर्ट कायदा १९६७ च्या संबंधित तरतुदींचा संदर्भ देईन. आम्हाला या संदर्भात कोणत्याही न्यायालयाकडून कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत,’’ असे ते म्हणाले. रेवन्ना यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.