१९८४ मधील शीख विरोधी हिंसाचारप्रकरणी न्यायालयाने मंगळवारी फाशीची व जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर दंगल पीडितांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी याप्रकरणी काँग्रेस, गांधी कुटुंबीय आणि पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे. शीख विरोधी दंगलीप्रकरणी सोनिया गांधींच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) नियुक्तीची मागणी केली आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या निवासस्थानी दंगलीचा कट रचला होता, असा आरोप त्यांनी केला. त्यावेळी राजीव गांधींची सत्ता होती. इतकेच नव्हे तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना लाय डिटेक्टर चाचणी देण्यास सांगावे, असेही बादल म्हणाले.

दरम्यान, शीख विरोधी दंगलप्रकरणी एसआयटीच्या कामाचे कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी कौतुक केले. पण त्यांनी यावेळी वेद मारवाह आणि रंगनाथ मिश्रा चौकशी आयोगाचाही उल्लेख केला. वेद मारवाह यांच्या नेतृत्वाखालील चौकशी पुढे जात होती. परंतु, चौकशीदरम्यान त्यांना हटवण्यात आले.

मारवाह यांच्यानंतर मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली १९८५ मध्ये दुसरा आयोग गठीत करण्यात आला. मिश्रा आयोगाने आपल्या अहवालात म्हटले की, १९८४ शीख विरोधी दंगल संघटित अपराध नव्हता. काही अधिकारी आपली जबाबदारी पार पाडण्यात कमी पडले. दुर्दैवी म्हणजे काँग्रेसने या अधिकाऱ्यांना पुरस्कार दिले, असा आरोप त्यांनी केला.