माजी मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी सुनंदा यांचे पुत्र शिव मेनन यांचे जबाब घेतल्यानंतर आता दिल्ली पोलिसांचे विशेष चौकशी पथक गुरुवारी शशी थरूर यांचे जबाब घेणार आहे.
दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी सांगितले की, साक्षीदारांचे जबाब नोंदवून त्याचे विश्लेषण केले जात आहे, काही साक्षीदारांचे जबाब आज घेतले जात असून थरूर यांच्याकडून अजून काही मुद्दय़ांचे स्पष्टीकरण घ्यायचे असल्यामुळे त्यांचा जबाब पुन्हा घेण्यात येणार आहे.
थरूर यांचा घरगुती कर्मचारी नारायण सिंग याचे पुन्हा जाबजबाब घेतले जातील काय, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, जे लोक त्या वेळी हॉटेलमध्ये उपस्थित होते त्यांच्याकडून काही स्पष्टीकरणे आवश्यक असून त्यांचे जाबजबाब घेतले जातील; त्यात नारायण सिंगचेही जबाब घेतले जातील. या प्रकरणी १५ जणांचे जबाब घेण्यात आले असून त्यात थरूर, त्यांचे कर्मचारी, मित्र यांचा समावेश आहे.
समाजवादी पक्षाचे अमर सिंह, पत्रकार नलिनी सिंह यांचेही जबाब झाले आहेत. सुनंदा थरूर (५२) यांचा १७ जानेवारी २०१४ रोजी दक्षिण दिल्लीतील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता. त्यापूर्वी शशी थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी थरूर यांचे जे संबंध होते त्याबाबत सुनंदा यांचे ट्विटरवर तरार यांच्याशी भांडण झाले होते. पोलिसांनी गेल्या महिन्यात सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या एकूण घडामोडींमुळे सदर प्रकरणास वेगळे वळण लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा