रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे. रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला. दोन्ही देशांमधील परिस्थिती गंभीर होत चालली असून याचे परिणाम जगभरात दिसू लागले आहेत. या युद्धाच्या परिस्थितीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाष्य केलंय.
सीतारामन म्हणाल्या, “दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता पसरली आणि जगाला अशा आव्हानांचा सामना कधीच करावा लागला नाही. परंतु अलीकडील काही घटनांमुळे भारताचा विकास आव्हानात्मक झाला आहे. जगात निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांमुळे भारताच्या विकासाला आव्हान मिळणार आहे, अशी भीती व्यक्त करत जागतील शांतता धोक्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने अशाप्रकारची गंभीर परिस्थिती अनुभवलेली नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.
“कारवाईसाठी सज्ज राहा”, एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरींचे कमांडर्सला आदेश!
यावेळी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध लवकरच थांबून शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील आर्थिक सुधारणांना या युद्धामुळे गंभीरपणे अडथळे येतील, अशी भीती सीतारामन यांनी वर्तवली.
युक्रेनमधील परिस्थिती –
रशियाने युक्रेनला पूर्व, उत्तर आणि दक्षिणेकडून घेरले असून रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या जवळ पोहोचले आहे. किव्ह शहरात स्फोटांचे आवाज आले असले तरी रशियाने मात्र किव्हवर हल्ला केला नसल्याचे स्पष्ट केले. वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, किव्ह येथे पाडण्यात आलेले विमान युक्रेनचे होते, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले, तर ते विमान रशियाचे असल्याचा दावा युक्रेनने केला. आपण २०० हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग फोर्सच्या मदतीने अन्तोनोव्ह विमानतळावर ताबा मिळवला, असा दावा रशियन लष्कराने केला.
प्राथमिक आकडेवारीनुसार, गुरुवारी पहाटे रशियाने आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या काही सैनिकांसह १३७ जण ठार आणि ३१६ जण जखमी झाले, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी उशिरा दिली. रशियाने राजधानी किव्हसह अन्य शहरांवर हवाई हल्ले केल्यामुळे युक्रेनमधील हजारो लोक सुरक्षिततेसाठी पश्चिमात्य देशांमध्ये पळून जात आहेत.