Pakistan marriage news: लग्न सोहळा म्हटलं की भरमसाठ खर्च आला. लग्नाचा सोहळा दिवसेंदिवस खर्चिक होत चालला आहे. यासाठी सामूहिक विवाह सोहळे, नोंदणी पद्धतीने लग्न करण्याच्या काही नव्या पद्धती समोर येत आहेत. पाकिस्तानमध्येही सहा भावांनी लग्न सोहळ्याचा खर्च कमी करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले. सहा भावांचे एकत्र लग्न व्हावे, यासाठी ते वर्षभर थांबले. कारण सहाव्या भावाच्या वयाची १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी बाकी होता. पाकिस्तानच्या खामा प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, पंजाब प्रांतात हे अनोख्या पद्धतीचे लग्न झाले असून लग्नाला १०० पाहुणे जमले होते.
लग्न झालेल्यापैकी एका मुलीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, अतिशय साधेपणाने लग्न करावे, असे इस्लाममध्ये सांगितले आहे. संपत्तीचे जाहीर प्रदर्शन करून लग्न खर्च करणे योग्य नाही. मोठ्या भावाने सांगितले की, लग्नाचा खर्च भागवण्यासाठी काही लोक जमीन विकतात. पण साधेपणानेही लग्न होऊ शकते आणि त्यावर कोणतीही बंधने नाहीत, हे आम्हाला दाखवून द्यायचे होते.
या सामूहिक लग्न सोहळ्यात कुणीही हुंडा घेतला किंवा दिला नाही. सहा भावांची ही कृती समाजात हुंडा बंदीचा संदेश देण्यास कारणीभूत ठरेल, असे बोलले जाते. या आगळ्यावेगळ्या लग्नामुळे लग्नाचा अर्थ प्रेम आणि आपुलकी असून श्रीमंतीचे प्रदर्शन नाही, हा संदेश देत आहोत, असे भावांनी सांगितले. माध्यमात आलेल्या बातम्यानुसार या संपूर्ण सोहळ्यासाठी केवळ ३० हजार रुपये इतका खर्च आला.