पीटीआय, चंडीगड : हरियाणामध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या जातीय हिंसाचारामध्ये मृतांची संख्या वाढून बुधवारी सहा झाली. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले की हिंसाचाराच्या घटनांमध्ये जखमी झालेल्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. नुहमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून परिस्थिती सामान्य झाली आहे. मात्र अन्य काही ठिकाणी हिंसाचाराच्या काही घटना घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत ११६ जणांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींना पकडण्यासाठी शोध सुरू आहे. या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे खट्टर यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली असून हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा सखोल तपास केला जाईल. हरियाणामधील जातीय हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली जाईल अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक पी के अग्रवाल यांनी बुधवारी दिली. हिंसाचारग्रस्त नुहमध्ये काही वेळासाठी संचारबंदी शिथिल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नुहमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत आणि प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

विहिंपची दिल्लीत निदर्शने

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने बुधवारी दिल्लीमध्ये विविध ठिकाणी हरियाणामधील जातीय हिंसाचाराविरोधात निदर्शने केली.  यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.यावेळी भगवे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’ आणि ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत बद्रापूर सीमेवरील रस्ता अडवून धरला. या निदर्शनांमुळे फरीदाबादहून दिल्लीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. पूर्व दिल्लीमध्ये निर्माण विहार मेट्रो स्थानकाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. दिल्ली पोलिसांनी शहरामध्ये सुरक्षा वाढवली असून अनेक निदर्शन स्थळांवर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की राजधानी दिल्लीमध्ये ऑगस्ट महिना नेहमीच विशेष संवेदनशील असतो, त्यातच सप्टेंबरमध्ये गुरुग्राम येथे जी२० परिषद होणार आहे, त्यामुळे पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत.

मोनू मानेसरच्या भूमिकेची चौकशी सुरू

हरियाणामधील जातीय हिंसाचारामध्ये बजरंग दलाचा कार्यकर्ता मोनू मानेसर याचा या हिंसाचारात काही हात आहे का याचाही तपास केला जात असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक पी के अग्रवाल यांनी बुधवारी दिली. बुधवारी गुरुग्राम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली.

यात्रेच्या संयोजकांनी जिल्हा प्रशासनाला गर्दीचा योग्य अंदाज दिला नव्हता, माहितीच्या अभावामुळे ही घटना घडल्याचे दिसत आहे. – दुष्यंत चौताला, उपमुख्यमंत्री, हरियाणा

निवडणुका जवळ येतात तेव्हा भाजप कारस्थान करतो आणि दंगली घडवून आणतो. – शिवपाल यादव, नेता, समाजवादी पक्ष

हरियाणातील हिंसाचारामधून हे दिसून येते की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. राज्य सरकार यात्रेला सुरक्षा प्रदान करू शकत नव्हते तर यात्रेला परवानगी द्यायलाच नको होती. – मायावती, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six dead in haryana riots 116 in police custody ysh
Show comments