प्रतिनिधीगृहाच्या लढतीत यशाची अपेक्षा
अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या ४३५ जागांसाठी आज, मंगळवारी, ६ नोव्हेंबर रोजी ५० राज्यांमध्ये निवडणूक होत असून, त्यात सहा भारतीय अमेरिकी उमेदवार चुरशीची लढत देत आहेत. या सहाही जणांना विजयी होण्याबद्दल आत्मविश्वास वाटतो, तर येथील माध्यमांनी यापैकी तिघांच्या विजयाचे भाकीत वर्तवले आहे. आतापर्यंत दलिपसिंग सौंड आणि बॉबी जिंदाल असे दोनच भारतीय प्रतिनिधीगृहावर निवडून गेले आहेत.
डॉ.अमी बेरा डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे कॅलिफोर्नियातील सेव्हन्थ काँग्रेसनल डिस्ट्रिक्ट मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून, त्यांना जिंकण्याची चांगली संधी असल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या डॅन लंग्रेन यांच्याशी त्यांना चुरशीची लढत द्यावी लागेल, असे निरीक्षण ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने नोंदविले आहे.
रिपब्लिकन पक्षातर्फे पंचविशीतील तरणेबांड उमेदवार रिकी गिल हे कॅलिफोर्नियातूनच नशीब अजमावत आहेत. त्यांच्यापुढे आतापर्यंत येथून तीन वेळा निवडून गेलेले डेमॉक्रॅटिक नेते जेरी मॅकनर्नी यांचे बिकट आव्हान आहे. माध्यमांनी जेरी वरचढ असल्याचे म्हटले आहे. काही पत्रांनी मात्र गिल यांच्याबाबत चमत्कार घडू शकत असल्याचे भाकीत वर्तवले आहे.
मिशिगनमधून डेमॉक्रॅट डॉ.सैद ताज लढतीत असून, त्यांच्या विरोधातील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार केरी बेन्टीव्होली दुबळे मानले जात असल्याने त्यांच्या विजयाची शक्यता वर्तवली जाते.
डॉ.ताज बिहारमधून येथे आले असून, वादग्रस्त राजकीय नेते सैद शहाबुद्दीन यांचे लहान भाऊ आहेत. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट या पत्रांनी त्यांना विजयाची संधी असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत स्थलांतर करण्यापूर्वी डॉ.ताज यांनी भारत तसेच ब्रिटनमध्ये वैद्यकीय व्यवसाय केला आहे.
पेनसिल्हानियातून डॉ. मानन त्रिवेदी डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. डेमॉक्रॅटिक उपेंद्र चिवूकुला यांच्या न्यूजर्सीतील प्रचार मोहिमेवर सँडी वादळाचा विपरीत परिणाम झाला. ते प्रांतिक विधिमंडळाचे उपसभापती आहेत. कॅलिफोर्नियातून डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे निवडणूक लढवीत असलेले जॅक उप्पल हे सर्वाधिक दुबळे भारतीय उमेदवार मानले जातात. त्यांचा मुकाबला बलिष्ठ अशा रिपब्लिकन टॉम मॅकक्लिंटॉक यांच्याशी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2012 रोजी प्रकाशित
अमेरिकेतील निवडणुकीत सहा भारतीयांची उमेदवारी
प्रतिनिधीगृहाच्या लढतीत यशाची अपेक्षाअमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या ४३५ जागांसाठी आज, मंगळवारी, ६ नोव्हेंबर रोजी ५० राज्यांमध्ये निवडणूक होत असून, त्यात सहा भारतीय अमेरिकी उमेदवार चुरशीची लढत देत आहेत. या सहाही जणांना विजयी होण्याबद्दल आत्मविश्वास वाटतो, तर येथील माध्यमांनी यापैकी तिघांच्या विजयाचे भाकीत …

First published on: 06-11-2012 at 02:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six indian candidate in american election