पीटीआय, काठमांडू
पूर्व नेपाळमध्ये ‘माऊंट एव्हरेस्ट’जवळ मंगळवारी खासगी व्यावसायिक हेलिकॉप्टर कोसळले. यात एका मेक्सिकन कुटुंबातील पाच सदस्यांसह सहा जण मृत्युमखी पडले.त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापक ज्ञानेंद्र भुल यांनी सांगितले की, ‘मनांग एअर’चे हेलिकॉप्टर ‘९ एन-एएमव्ही’ने सकाळी दहा वाजून चार मिनिटांनी सोलुखुंबू येथील सुर्की विमानतळावरून काठमांडूला जाण्यासाठी उड्डाण केले होते.
सकाळी दहा वाजून १३ मिनिटांनी १२ हजार फूट उंचीवर त्याचा अचानक संपर्क तुटला. दुर्गम डोंगराळ सोलुखुंबू जिल्ह्यातील लिखेपिके ग्रामीण पालिकेच्या लामजुरा भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. त्रिभुवन विमानतळाचे प्रवक्ते टेकनाथ सितौला यांनी सांगितले, की शोध मोहिमेदरम्यान अपघातस्थळावरून सहाही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. येथील डोंगराळ प्रदेशाचा हवाई दौरा करून हे लोक सुर्कीहून काठमांडूला परतत होते.
‘काठमांडू पोस्ट’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ‘मनांग एअर’चे व्यवस्थापक राजू न्यूपेन यांनी सांगितले की, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जण या अपघातात ठार झाले. त्यांनी सांगितले की, या सहा जणांमध्ये कॅप्टन चेतबहादूर गुरुंग आणि मेक्सिकोचे पाच नागरिक आहेत. जिल्हा पोलिसप्रमुख दीपक श्रेष्ठ यांनी सांगितले की, पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे समजते.
‘माय रिपब्लिका’ वृत्त संकेतस्थळानुसार पाचही परदेशी प्रवासी मेक्सिकन कुटुंबातील आहेत. त्यांची ओळख पटली आहे. सिफुएन्टेस जी. फर्नाडो (९५ वर्षे), सिफुएन्टेस िरकन इस्माईल (९८) या पुरुषांसह सिफुएन्टेस गोंगलेझ अब्रिल (७२), गोंगलेझ ओलासिओ लुझ (६५) आणि सिफुएन्टेस जी. मारिया जेसे (५२) या महिलांचा मृतांत समावेश आहे.विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. त्यांनी अपघातस्थळी आग लागल्याचे पाहिले.