कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनी बुधवारी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून इतर चार जणांचा शोध सूरू आहे. आफताब मकबूल अहमद चंदनकट्टी (२४) आणि मदरसाब महमद इसाक (२३) या आरोपींना पोलिसांनी अटक केली. हे दोघे कोणत्याही संघटनेचे पदाधिकारी नाहीत. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारचा गुन्हा केल्याचे उघडकीस आले.
हे वाचा >> सीईओ सूचना सेठने मुलाची हत्या करण्याआधी पतीला केला होता ‘हा’ मेसेज, पोलीस तपासात खुलासा
हावेरी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अंशूर कुमार म्हणाले की, पोलिसांकडून आणखी तपास सुरू आहे. टोळक्याने हल्ला केल्यानंतर याची चित्रफित काढली होती, जी आता व्हायरल झाली आहे. या चित्रफितीवरून इतर चार आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील.
पोलिसांनी पुढे सांगितले की, २६ वर्षीय विवाहित मुस्लीम धर्मीय महिलेचे एका हिंदू धर्मीय व्यक्तीसह संबंध आहेत. दोघांचीही या नात्याला संमती आहे. हे दोघेही ७ जानेवारी रोजी जिल्ह्यातील हंगल शहरात एका हॉटेलमध्ये राहण्यास आले होते. तिथेच त्यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान सदर महिला आणि तिच्या पतीने दावा केला आहे की, आरोपींनी महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या दाव्याचाही आम्ही तपास करत असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.
आणखी वाचा >> हत्येपासून ते बलात्कारापर्यंतच्या आरोपांसाठी ‘या’ क्रिकेटपटूंना घडलाय तुरुंगवास
सध्या पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३५४ (स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला किंवा फौजदारीपात्र शक्तीचा वापर करणे), कलम ५०६ (गुन्हेगारी स्वरुपाचा धाकदपटशा दाखविणे), कलम १४३ (बेकायदेशीर जमावाचा भाग होणे), कलम १४७ (दंगा करणे), कलम १४९ (एखादा अपराध करण्यासाठी बेकायदेशीर जमावाचा घटक असणे), कलम ४४८ (गृह अतिक्रमण केल्याबद्दल शिक्षा) आणि कलम ३२३ (इच्छापूर्वक दुखापत पोचवण्याबद्दल शिक्षा) अशा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.