पीटीआय, हैदराबाद
तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात गुरुवारी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या गोळीबारात दोन महिलांसह सहा नक्षलवादी ठार झाले. बेकायदा माकप या संघटनेचे ते सदस्य होते.गोळीबारात तेलंगणा पोलिसांच्या नक्षलविरोधी दलातील दोन कमांडोही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचाी प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.काराकागुडेम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोथे गावाच्या जंगल परिसरात सकाळी ६.४५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सशस्त्र नक्षलवाद्यांनी गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर बेछूट गोळीबार केला, असे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नक्षलवाद्यांना गोळीबार थांबवण्याचा इशारा देण्यात आला. मात्र नक्षलवाद्यांचा गोळीबार न थांबल्याने पोलीस दलानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. नक्षलवाद्यांकडून गोळीबार थांबल्यानंतर पोलीस दलाने परिसराची झडती घेतली असता सहा मृतदेह सापडले. मृत झालेले सहाही जण नक्षलवादी संघटना असलेल्या बेकायदा माकपचे सदस्य होते, असे पोलिसांनी सांगितले.एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शेजारच्या छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा एक गट तेलंगणात गेल्याच्या माहितीच्या आधारे विशेष पोलीस दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.

Story img Loader