अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदच्या तक्रारीनंतर इंदूरमधील शासकीय विधी महाविद्यालयातील सहा प्राध्यापकांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या प्राध्यापकांकडून कट्टरतावादी विचारधारा, लव्ह जिहाद आणि मांसाहाराला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे. मिर्झा मोजीज बेग, फिरोज अहमद मीर, सुहेल अहमद वाणी आणि पूर्णिमा बेसे, मिलिंद कुमार गौतम, अमेक खोखर अशी निलंबित करण्यात आलेल्या प्राध्यापकांची नावे आहेत.
हेही वाचा – “दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
अभाविपच्या तक्रारीनुसार, इंदुरच्या शासकीय विधी महाविद्यालयातील काही मुस्लीम प्राध्यपकांकडून लव्ह जिहाद आणि कट्टरतावादी विचारधारेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राचार्य शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी जातात, त्यामुळे शुक्रवारी महाविद्यालयात शिकवले जात नाही, असा आरोपही अभाविपकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा – “जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!
दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य रहमान यांनी अभाविपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ”अभाविपने ज्याप्रकारे आरोप केले आहेत, ते अत्यंत चुकीचे आहेत. महाविद्यालयात अशाप्रकारे कोणतेही वातावरण नाही. मात्र, अभाविपकडून करण्यात आलेले आरोप गंभीर असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच संबंधित प्राध्यापकांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.