आरोग्य यंत्रणांकडून प्रचंड मोठय़ा प्रमाणावर दक्षता राखली जात असली, तरीही करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. सलग सातव्या दिवशी करोनाच्या रुग्णांमध्ये सहा हजारहून अधिकने वाढ झाली.
गेल्या चोवीस तासांमध्ये ६,५६६ रुग्णांनी भर पडली आहे तर १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार ३३३ झाली असून एकूण मृत्यू ४,५३१ आहे. ६७,६९२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता, इंदौर, जयपूर, जोधपूर, चेंगळपट्टू आणि थिरूवल्लूर या १३ शहारंमध्ये ७० टक्के करोनाचे रुग्ण आहेत.
लसनिर्मितीसाठी जोर
भारतातही लस शोधण्यासाठी प्रयत्न केले जात असून वैद्यकीय संस्था, जैव-वैद्यकीय संशोधन संस्था, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती असे तब्बल ३० संस्था-गट-व्यक्ती संशोधन करत आहेत. त्यापैकी २० गट अधिक वेगाने प्रगती करत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी दिली.
‘स्थलांतरितांना मोफत प्रवास करू द्या’ : नवी दिल्ली : देशभरात अडकून पडलेल्या आणि आपल्या गावी परत जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडून रेल्वेगाडी किंवा बसद्वारे प्रवासाकरता कुठलेही भाडे आकारू नये आणि त्यांना अन्न व पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. या मजुरांची रेल्वे किंवा बसने जाण्याची सोय होईपर्यंत त्यांना हे अन्न कुठे मिळेल याची त्यांना सूचना देण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
रेल्वे आरक्षणासाठी १२० दिवसांची मुदत
रेल्वेने सर्व विशेष गाडय़ांसाठीच्या आरक्षणाची मुदत गुरुवारी ३० दिवसांवरून १२० दिवसांपर्यंत वाढविली आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व विशेष गाडय़ांच्या अग्रीम आरक्षणाचा कालावधी सध्याच्या ३० दिवसांवरून १२० दिवसांपर्यंत वाढविला आहे. येत्या १ जूनपासून २०० नव्या विशेष गाडय़ा धावणार आहेत, त्याचप्रमाणे ३० राजधानी गाडय़ा १२ मेपासून धावत आहेत.