नवी दिल्ली : संसदेमधील घुसखोरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शनिवारी महेश कुमावत या सहाव्या आरोपीला अटक केली. त्याच्यावर आरोपींचे फोन नष्ट करण्याचा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याला विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याची १५ दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायाधीशांनी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपींचे फोन नष्ट करण्यात महेशचा सहभाग होता असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तसेच देशामध्ये अराजक माजवण्याच्या कटामध्येही तो सहभागी असल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला. महेश हाही आता हटवण्यात आलेल्या ‘भगत सिंग फॅन क्लब’ पेजचा सदस्य होता.
या प्रकरणाचा सूत्रधार ललित झा हा गुरुवारी पोलिसांसमोर हजर झाला तेव्हा महेश कुमावत हाही त्याच्याबरोबर होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोघांनाही विशेष शाखेकडे सोपवले होते. तेव्हापासून महेश कुमावतची चौकशी केली जात होती. त्याला शनिवारी अटक करण्यात आली.
हेही वाचा >>> ६० कोटी भारतीयांच्या जीवनमानात सुधारणा! अमित शहा यांची मोदी सरकारवर स्तुतिसुमने
दरम्यान, महेशपूर्वी अटक करण्यात आलेल्या पाच जणांनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर आत्मदहन करण्याच्या आणि पत्रकांचे वितरण करण्याच्या पर्यायांचा विचार केला होता अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी दिली. याप्रकरणी आतापर्यंत मनोरंजन डी, सागर शर्मा, नीलम देवी, अमोल शिंदे, ललित झा आणि महेश कुमावत या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी समिती
संसद भवनाच्या सुरक्षेच्या विविध पैलूंचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असल्याची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी लोकसभेच्या सदस्यांना पत्रावाटे दिली. १३ डिसेंबरच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये हा या समिती स्थापनेचा उद्देश असल्याचे बिर्ला यांनी या पत्रात नमूद केले आहे.
‘आमचा मुलगा असे करू शकत नाही!’
दरभंगा (बिहार) : या घुसखोरीचा सूत्रधार ललित झा याच्या पालकांना अजूनही आपला मुलगा यामध्ये सहभागी आहे यावर विश्वास बसत नाही. ललितचे वडील देवानंद झा हे उदरनिर्वाहासाठी कोलकात्यामध्ये पौरोहित्य करतात. मला माझ्या मुलाच्या अटकेबद्दल इतर लोकांकडून समजले असे ते म्हणाले. तर आई मंजुळाने ‘‘माझा मुलगा बदमाश नाही. तो काहीही गैरकृत्य करू शकत नाही. त्याला नेहमीच लोकांना मदत करायला आवडते’’, असे रडतरडत सांगितले.
बेरोजगारी, महागाईमुळे घुसखोरी!
नवी दिल्ली : संसद भवनामध्ये झालेल्या घुसखोरीमागे बेरोजगारी आणि वाढती महागाई ही कारणे आहेत असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी व्यक्त केले. काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांमुळे नोकऱ्या न मिळालेल्या युवकांनी संसदेत घुसखोरी केली. ही घुसखोरी म्हणजे तरुणांमध्ये दीर्घकाळापासून खदखदत असलेला संताप आहे असा दावाही राहुल यांनी केला. मात्र, प्रत्येक बाबतीत राजकारण करू नका असा सल्ला भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी राहुल यांना दिला. तर देशातील बेरोजगारी ३.२ टक्के इतकी कमी असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला.