शेतकरी आंदोलनासाठी ४६ शेतकरी संघटनांनी मिळून तयार केलेल्या संयुक्त किसान मोर्चानं मोठा निर्णय घेतलाय. संयुक्त किसान मोर्चानं स्वराज अभियानचे प्रमुख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांचं निलंबन केलंय. हे निलंबन १ महिन्यासाठी असणार आहे. त्यामुळे पुढील १ महिना योगेंद्र यादव शेतकरी आंदोलनाच्या कोणत्याही बैठकीत, कार्यक्रमात किंवा निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाहीये.

योगेंद्र यादव यांच्या निलंबनाचं कारण काय?

लखीमपूर खेरीमध्ये भाजप नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर संतप्त आंदोलकांनी गाडीत असलेल्या आरोपींना बेदम मारहाण केली. यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. योगेंद्र यादव यांनी या मृत भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानं संयुक्त किसान मोर्चानं ही निलंबनाची कारवाई केलीय.

नेमकं काय घडलं?

योगेंद्र यादव संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य आहेत. त्यांनी मृत भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना भेट दिल्यानं संयुक्त किसान मोर्चातील काही शेतकरी संघटनांनी योगेंद्र यादव यांच्यावर कारवाईची मागणी केली. भारतीय किसान युनियनचे नेते मनजित सिंग राय यांनी दिलेल्या माहितीनुसार ४६ पैकी जवळपास ३२ शेतकरी संघटनांनी योगेंद्र यादव यांनी या भेटीसाठी सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी केली. यानंतर या विषयावर संयुक्त किसान मोर्चाच्या सर्व सदस्यांची आज (२२ ऑक्टोबर) बैठक झाली.

हेही वाचा : सिंधू बॉर्डरवर हात पाय तोडून करण्यात आलेल्या हत्येवर संयुक्त किसान मोर्चाची भूमिका काय? शेतकरी नेते म्हणाले…

चर्चा न करता भेटीसाठी माफीची तयारी, मात्र भेटीवर योगेंद्र यादव ठाम : सूत्र

योगेंद्र यादव यांच्या जवळील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखीमपूर हिंसाचारानंतर योगेंद्र यादव यांना मृत भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी वाटली. त्यामुळे त्यांनी ही भेट घेतली. बैठकीत योगेंद्र यादव यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या इतर नेत्यांशी चर्चा न करता भेट घेण्यासाठी माफीची तयारी दाखवली, मात्र पीडित कुटुंबाच्या भेटीविषयी माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली.

Story img Loader