भारतीय हवामान खात्याने (IMD) रविवारी (२९ मे) केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली. यानंतर सर्वत्र मान्सूनच्या आगमनाच्या बातमीने चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. मात्र, दोनच दिवसात ही घोषणा वादग्रस्त ठरलीय. हवामानाचा अंदाज लावणाऱ्या स्कायमेटसह (Skymet) काही स्वतंत्र हवामान संस्थांनी आयएमडीच्या या घोषणेवर आक्षेप घेतला आहे. आयएमडीने केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची घोषणा करण्यासाठी ज्या मुलभूत निकषांची पूर्तता व्हायला हवी ते पूर्ण केले नसल्याचा गंभीर आरोप या संस्थांनी केलाय. यानंतर आयएमडीने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
आयएमडीचे संचालक मृत्यूंजय मोहापात्रा बिझीनेस स्टँडर्ससोबत बोलताना म्हणाले, “आम्ही वैज्ञानिक निकषांबाबत कधीही तडजोड करत नाही. कारण केवळ खासगी हवामान संस्थाच नाही, तर जगभरातील प्रतिष्ठित संस्थांनाही आयएमडीच्या अंदाजाची मदत होते. अंदाज वर्तवताना आमची ओळख वैज्ञानिक निकषांचं कठोर पालन करण्यासाठी आहे.”
आयएमडीच्या घोषणेवर स्कायमेटचे नेमके आक्षेप काय?
स्कायमेटने सोमवारी (३० मे) जारी केलेल्या निवेदनात आयएमडीच्या घोषणेवर तीव्र आक्षेप घेतले. यात म्हटलं आहे, “आयएमडीने रविवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यासाठी केवळ दोन दिवसांच्या वाऱ्याचा वेग आणि ओएलआरचा (आऊटगोईंग लाँगव्हेव रेडिएशन) विचार केला. मात्र, सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे केरळमधील विविध स्टेशन्सवरील पावसाच्या प्रमाणाच्या निकषाचं पालन झालेलं नाही.”
“केवळ ४० टक्के ठिकाणीच पावसाचा निकष पूर्ण”
“आयएमडीनेच तयार केलेल्या निकषांप्रमाणे मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यासाठी ठराविक स्टेशनवर दोन दिवस पावसाच्या निकषाची पूर्तता होणं आवश्यक आहे. मात्र, हे निकष केवळ २९ मे या एकच दिवशी पूर्ण झाले आहेत. एक दिवस आधी म्हणजे २८ मे आणि एक दिवस नंतर म्हणजे ३० मे रोजी निश्चित केलेल्या स्टेशन्सपैकी केवळ ४० टक्के ठिकाणीच पावसाचा निकष पूर्ण झाला,” असंही स्कायमेटने सांगितलं.
हेही वाचा : राज्यात सोमवारपासून मेघगर्जनेसह पाऊस, मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पोषक वातावरण
“अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झाला नाही”
“केवळ एका दिवसाच्या पावसाच्या आधारे मान्सून आगमनाची घोषणा करणे हे निकषांचं गंभीर उल्लंघन आहे. असं याआधी कधीही झालेलं नाही,” असा आरोप स्कायमेटने केला आहे. तसेच आमच्या निरिक्षण आणि नोंदीनुसार अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झाला नसल्याचा दावाही स्कायमेटने केला. तसेच १४ पैकी ७ स्टेशन्सवर अजिबात पाऊस पडलेला नाही आणि २ स्टेशन्सवर १ मिमीपेक्षा कमी पाऊसाची नोंद आहे, असंही त्यांनी नमूद केलं.