सक्तीचे मानवी हस्तांतरण, सक्तीचा देहविक्रय आणि बालमजुरी २०२० सालापर्यंत जगातून हद्दपार करण्यासाठी मंगळवारी जगातील ख्रिस्ती व मुस्लीम धर्मातील प्रमुख धुरीण ‘द ग्लोबल फ्रीडम नेटवर्क’ या संस्थेच्य माध्यमातून एकत्र आले.
ऑस्ट्रेलियातील अब्जाधीश उद्योगपती अॅण्ड्रय़ू फॉरेस्ट यांनी या संघटनेचा पाया घातला असून जगभरातील उद्योगांनाही बालमजुरी आणि मानवी तस्करी रोखण्याच्या कामात सहभागी करून घेतले जाणार आहे.
गुलामगिरी आणि वेठबिगारी ही जणू प्राचीन काळातली गोष्ट आहे, असा आजही गैरसमज आहे. प्रत्यक्षात आज जगात तब्बल तीन कोटी लोक गुलामगिरीत आहेत. आजवरच्या मानवी संस्कृतीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे प्रमाण आहे, असे फॉरेस्ट यांनी सांगितले.
या मोहिमेसाठी व्हॅटिकन, अँग्लिकन कम्युनियन आणि कैरोतील इस्लामी अल-अजहर विद्यापीठ यांचा प्रमुख पुढाकार आहे. या संस्थांचे क्षेत्र हे तब्बल तीन अब्ज लोकांना कवेत घेणारे असून यामुळे निम्मे जग या मोहिमेत सहभागी होणार आहे. अन्य धर्मश्रद्धांच्या प्रतिनिधींनाही यासाठी आमंत्रित केले जात आहे, असे फॉरेस्ट म्हणाले. गुलामगिरीविरुद्धच्या या लढय़ाच्या संकल्पपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी व्हॅटिकनचे पोप फ्रान्सिस, कँटेरबरीचे आर्चबिशप जस्टिन वेल्बी आणि अल अजहरचे प्रमुख इमाम अहमद अल तयब हे जातीने उपस्थित होते.
जगभर आर्थिक प्रगती जशी वाढत आहे तसेच उद्योगांमध्येही गुलामगिरी वेगळ्या रूपात प्रकटली आहे, असे फॉरेस्ट म्हणाले. आपण या प्रश्नावर बिल गेट्स आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांच्याशी चर्चा केली असून त्यांनीही सक्रीय सहभागाची तयारी दाखविली आहे, असेही त्यांनी सांगितले.
जगात गुलामांची संख्या २०१३च्या पाहणीनुसार दोन कोटी ९८ लाख.
गुलामगिरी पश्चिम आफ्रिकी देश मॉर्टानियात सर्वाधिक. दुसऱ्या क्रमांकावर हैती आणि तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान.
५० बडय़ा उद्योगांचा मोहिमेत सहभाग.
गुलामगिरीविरोधी मोहिमेला आर्थिक साह्य़ासाठी २० सर्वात प्रगत देशांना स्वतंत्र निधी राखण्यासाठी आवाहन.

 

Story img Loader