दीडशे फूट म्हणजे फुटबॉल मैदानापेक्षा थोडा कमी आकाराएवढा बहुचर्चित लघुग्रह शुक्रवारी उशिरा पृथ्वीजवळून गेला, परंतु त्यात अपेक्षेप्रमाणे पृथ्वीला काही हानी झाली नाही. २०१२ डीए १४ असे या लघुग्रहाचे नाव असून तो आपल्या पृथ्वीच्या १७,२०० मैल अंतरावरून गेला. गेल्या शतकभराच्या काळात कुठलाही अवकाशीय घटक पृथ्वीच्या इतका जवळून गेला नव्हता. दरम्यान योगायोगाचा भाग म्हणजे हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाण्याच्या अगोदर रशियाच्या उरल प्रांतात उल्केचा अवकाशात स्फोट झाला व तो अशनीच्या रूपात खाली कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत १२०० जण जखमी झाले आहेत.
खगोलशास्त्रज्ञ काय म्हणतात? नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, उल्केच्या स्फोटाचा लघुग्रहाशी काही संबंध नाही. कारण उल्का व लघुग्रह एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रवास करीत होते. ऑस्ट्रेलिया व जगातील काही वैज्ञानिकांनी शुक्रवारी उशिरा २०१२ डीए १४ हा लघुग्रह रात्रीच्या स्वच्छ आकाशातून जाताना पाहिला व ते आनंदाने हरखून गेले. कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे पृथ्वी निकट पदार्थ शोधन कार्यक्रमाचे प्रमुख पॉल चोडस यांनी सांगितले की, हा लघुग्रह आपल्या मार्गाने गेला. आपले दळणवळण व हवामान उपग्रह हे २२,३०० मैल उंचीवर असतात, त्यापेक्षाही जवळून हा लघुग्रह गेला. तो नुसत्या डोळ्यांनी दिसणारा नव्हताच. त्याची प्रकाशमानता ७.० होती. साधारणपणे ६.० प्रकाशमानतेचा पदार्थ हा साध्या डोळ्यांनी दिसू शकतो. रशियात ज्या उल्केचा स्फोट झाला ती ४९ फूट रुंद व ७००० टन वजनाची होती. उल्केचा आकार हा लघुग्रहाच्या एकतृतीयांश इतकाच होता.
ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार?   नासाच्या ग्रहीय विज्ञान विभागाचे संचालक जिम ग्रीन यांनी सांगितले की, उल्केचा स्फोट व नंतर लघुग्रह पृथ्वीजवळून जाणे या पाठोपाठच्या घटना ऐतिहासिक व दुर्मीळ होत्या. लघुग्रहाची लांबी फुटबॉल मैदानाच्या निम्मी होती, तर स्फोट झालेल्या उल्केची लांबी १५ यार्ड होती. नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, साधारण चाळीस वर्षांतून एखादा मोठा अवकाशस्थ लघुग्रह किंवा काही वेळा उल्का पृथ्वीनिकट येतात व तो आदळण्याची शक्यता बाराशे वर्षांतून कधीतरी असते.

Story img Loader