पीटीआय, नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची पाटी कोरीच राहिली. महाराष्ट्रातील आठ शहरे स्पर्धेत होती, मात्र पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर यांना मिळालेले दुय्यम पुरस्कार वगळता अन्य मोठय़ा शहरांनी मात्र निराशा केली. महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, नाशिक, पुणे, सोलापूर, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांच्या महानगरपालिकांनी स्वच्छता, सुशोभीकरणासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च केला होता. राज्य सरकारनेही त्यांना मुक्त हस्ते निधी दिला होता.
मात्र, सुशोभीकरणावर मोठा खर्च करूनही सर्व शहरे ‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत मागे पडली. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराला ‘स्मार्ट सारथी अॅप’साठी प्रशासन या विभागात दुसरा क्रमांक मिळाला, तर सोलापूरने पश्चिम विभागात ‘स्मार्ट सिटी’ पुरस्कार पटकावला. मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर देशातील पहिल्या क्रमांकाची ‘स्मार्ट सिटी’ ठरले तर गुजरातमधील सुरत आणि उत्तर प्रदेशातील आग्रा या शहरांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने सन २०२२च्या ‘राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कारां’ची घोषणा शुक्रवारी केली. इंदूर येथे २७ सप्टेंबरला होणाऱ्या सोहळय़ात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
विविध विभागांसाठीच्या ६६ विजेत्यांमध्ये मध्य प्रदेशने ‘सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार’ पटकावला, तर तमिळनाडूने दुसरा क्रमांक मिळवला. तसेच राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकासाठी निवड करण्यात आली. केंद्रशासित प्रदेश’ या विभागात चंडीगडला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ‘सर्वोत्कृष्ट प्रशासन विभागा’त चंडीगड ‘ई-गव्हर्नन्स’ सेवांमुळे विजेते ठरले आहे. मोदी सरकारच्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या १०० शहरांमध्ये इंदूर अव्वल, सुरत दुसऱ्या आणि आग्रा तिसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंदूरला सलग सहाव्यांदा देशातील सर्वात ‘स्वच्छ शहर’ घोषित करण्यात आले होते.
‘बिल्ट एन्व्हायर्नमेंट’ या गटात कोईम्बतूर शहर हे रस्ते तसेच तलावांची दुरुस्ती आणि त्यांचे पुनरुज्जीवीकरणात सर्वोत्कृष्ट ठरले. या विभागात दुसरा क्रमांक इंदूरने मिळवला. तिसरा क्रमांक न्यू टाऊन कोलकाता आणि कानपूर यांना संयुक्तरित्या जाहीर करण्यात आला आहे.