स्मार्ट शहरांमध्ये आधी घरे स्मार्ट असावी लागतात. तशी स्मार्ट सुविधा असलेली घरे उपलब्ध आहेत, त्यातील अनेक कामे स्वयंचलित पद्धतीने म्हणजे बटनाच्या इशाऱ्यावर होतात पण ही घरे सुरक्षित असतात असे मानण्याचे अजिबात कारण नाही. अलिकडेच भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह काही वैज्ञानिकांनी एका स्मार्ट घराचा पिन कोड हॅक करून त्याची सुरक्षा यंत्रणा मोडीत काढली. घराच्या प्रवेशद्वारासाठी असलेला कोड म्हणजे सांकेतांक त्यांनी हॅक केला. संशोधकांनी सॅमसंग स्मार्ट थिंग्ज सिस्टीमवर चार सायबर हल्ले केले. सॅमसंग स्मार्ट थिंग्ज हे इंटरनेट ऑफ थिंग्जमधील एक विश्वासार्ह उत्पादन असूनही त्याचे हॅकिंग करता आले. वास्तव जगाला आभासी जगाशी जोडण्याचे काम ही यंत्रणा करत असते. मिशीगन विद्यापीठाचे अतुल प्रकाश यांनी सांगितले, की आयओटी सॉफ्टवेअर बघितले तर त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ते धोकादायक आहे. एकमेकांना जोडलेली उपकरणे घरात लावली जातात, तेव्हा तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. कारण तसे नियंत्रण तुम्हाला योग्य वाटते का हा प्रश्न आहे, असे मिशीगन विद्यापीठाचे एरलेन्स फर्नांडिस यांनी सांगितले. स्वतंत्र उपकरणे ही जास्त उणिवा असलेली असतात. कारण त्यात इलेक्ट्रॉनिक लॉक, थर्मोस्टॅट, ओव्हन, स्प्रिंकल, लाइट, मोश सेन्सर अशांचा समावेश स्मार्ट यंत्रणात होतो यात ते एकमेकांना जोडलेले असतात. त्यांचे दूरनियंत्रण केले जाते. स्मार्टथिंग्जचा वाढता वापर बघता त्याच्या अँड्राइड समकक्ष अॅपच्या मदतीने तुम्ही त्यांचे नियंत्रण करू शकते. ती अॅप्स १ लाख वेळा डाउनलोड झाली आहेत. स्मार्टथिंग्ज अॅप स्टोअरमध्ये स्मार्ट अॅपमध्ये तिसराच विकसक काम करीत असतो व ही स्मार्ट अॅप क्लाउडवर चालत असतात. त्यामुळे ग्राहकांना तशी विशिष्ट पद्धतीची ५०० अॅप्स दिली आहेत. वैज्ञानिकांनी स्मार्टथिंग्जच्या प्रोग्रॅमिंग फ्रेमवर्कची सुरक्षा चाचणी घेतली असता त्यात अनेक त्रुटी दिसून आल्या. त्यांनी असे दाखवून दिले, की स्मार्टअॅपचा पिनकोड नवीन सेट करता येतो व त्याला गंडवता येते. तो नवीन पिनकोड घेऊन हॅकर त्या घराचे दार उघडू शकतो. स्मार्टअॅपला लॉक पिक मालवेअर अॅप असते त्याचा सांकेतांक उलगडता येतो. स्मार्टअॅप हे दूरनियंत्रित पद्धतीने वापरता येते त्यामुळे प्रत्यक्ष त्या घराजवळ न जाताही तुम्हाला दुसरा सांकेतांक तयार करता येतो किंबहुना हॅकिंग करता येते. स्मार्ट अॅप हे व्हेकेशन मोड मध्ये असताना दिवे लावणे व मालवणे याची सोय दुसऱ्या अॅपच्या मदतीने केली जाऊ शकते. यात फायर अलार्मही बंद करता येऊ शकते. त्यासाठी चुकीचे संदेश त्याला पाठवले जातात. स्मार्ट अॅप यंत्रणा ही उपकरणांशी खेळ करण्याचा खूप वाव देत असल्याने या उपकरणांनी निर्मिलेले संदेश अनेक ठिकाणी जातात. जर समजा तुम्ही कार्यालयातील बल्ब बदलण्याची कुणाला परवानगी दिली, तर ती व्यक्ती पूर्णपणे तुमच्या कार्यालयाचा ताबा घेऊ शकते. त्यात तुमच्या फायलिंग कॅबिनेटचाही समावेश असेल व महत्त्वाची माहिती त्या बल्ब बदलणाऱ्या व्यक्तीच्या हाती लागू शकते, असे प्रकाश यांनी म्हटले आहे.
स्मार्टहोम यंत्रणा सुरक्षित नसल्याचे प्रयोगानिशी सिद्ध
स्मार्ट शहरांमध्ये आधी घरे स्मार्ट असावी लागतात. तशी स्मार्ट सुविधा असलेली घरे उपलब्ध आहेत
First published on: 28-05-2016 at 01:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart home system is not secure