मोटारीच्या खिडकीच्या काचांवर आता तुमच्या स्मार्टफोनचा पडदा दिसणार असून त्याच्या मदतीने टेक्स्टिंग, व्हॉइसमेल, इमेल करता येतात. विशेष म्हणजे अमेरिकेतील भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांनी ही यंत्रणा तयार केली आहे. या तंत्रज्ञानाचे नाव हेड्सअप असे आहे. स्मार्टफोनवर सतत खाली पाहून तुम्ही काम करीत असता येथे खिडकीच्या काचेवर पडदा असल्याने मान खाली न घालता तुम्ही काम करू शकता. शिवाय गाडी चालवत असताना काही अडचणीही येत नाहीत. यात आवाज ओळखण्याची सुविधा असून स्पर्श न करताही स्वाइपिंग करता येते, असे याची निर्मिती करणाऱ्या नेक्स्ट या अमेरिकी कंपनीने म्हटले आहे.
टेक्स्ट, कॉल्स, मेसेज नोटिफिकेशन व नॅव्हिगेशन तुमच्या मोटारीच्या काचेवर दिसत असल्याने तुम्हाला समोर बघून काम करता येते. जेव्हा चालक गाडीत बसतो व हेड्सअप हे अ‍ॅप्लीकेशन चालू करतो किंवा करते व हेडसअप इंटरफेस यूएसबी किंवा ब्लूटूथ मार्फत जोडले जाते. जेव्हा हेडसअप कार्यान्वित नसते तेव्हा काच पारदर्शक दिसते. जेव्हा संबंधित व्यक्ती कॉल किंवा मेसेज घेते तेव्हा तो पारदर्शक पडद्यावर दिसतो. एखादी व्यक्ती आलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करून आवाजी किंवा आदेशवजा सूचनांच्या आधारे प्रतिसाद देऊ शकते. मॅशबल नेक्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णव रायचौधुरी यांच्या मते हेडसअप मुळे कुठल्याही संदेशाला चटकन प्रतिसाद देता येतो.