नैराश्य आल्यानंतर अनेक जण स्मार्टफोनचा आणि समजमाध्यमांचा आधार घेतात. व्हॉट्सअॅप, फेसबुक यांच्या साहाय्याने मित्रांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. पण स्मार्टफोन तुमचे नैराश्य दूर करीत नाही, तर तो आणखी वाढवितो, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. विशेष म्हणजे भारतीय संशोधक व मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या ‘कॉलेज ऑफ कम्युनिकेशन आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेचे अधिष्ठाता प्रभू डेव्हिड यांचाही या संशोधनात मोठा वाटा आहे. लोक अलीकडे मानवी संवादाला इलेक्ट्रॉनिक यंत्रांच्या माध्यमातून संवाद साधून पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे, पण ते विश्व आभासी असते त्यातून मानवी पातळीवरील संवादातून मिळणारे समाधान मिळत नाही, असे या वैज्ञानिकांचे मत आहे.नकारात्मक भावनांचा सामना करण्यासाठी अनेक जण तात्पुरत्या विरंगुळ्यासाठी मोबाइल फोनचा वापर करतात आणि कालांतराने ते त्यावर विसंबून राहतात. आपण तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली असली, तरी मानवी पातळीवरील संवादाला खूप महत्त्व आहे.मोबाइल फोन मानवी संवादाची नक्कल करू शकतो, ते सगळे जग खरे आहे, असे वाटू लागते पण ते आभासी व कृत्रिम असते. सोल येथील साँगँग विद्यापीठाचे जुंग युन किम यांनी सांगितले, की दोन व्यक्तींमधील संवादामुळे नकारात्मक भावनांपासून खरोखर थोडे संरक्षण मिळते, त्यामुळे मोबाइल फोनमुळे नैराश्यात होणारी वाढही कमी करते. मोबाइलच्या अतिआहारी जाण्यापेक्षा समोरासमोर संभाषणाची सवय करण्याची वेळ आता आली आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळे एक तर वेळ कसा काढायचा ही समस्या सुटते आणि दुसरे म्हणजे नकारात्मक भावना कमी होतात, असे वापरकर्त्यांना वाटते, पण ते खरे नाही.डेव्हिड यांच्या मते मोबाइल फोनमुळे मानसिक समस्या सुटत नाहीत उलट वाढतात. गंमत किंवा करमणुकीसाठी काही वेळा लोक मोबाइलचा वापर करतात त्याचा मात्र खूप दुष्परिणाम होत नाही. कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांना मोबाइलच्या माध्यमातून म्हणजे व्हॉट्सअॅप, फेसबुक या मार्गानी भेटण्यापेक्षा प्रत्यक्ष संवाद साधला पाहिजे.मित्रांशी, कुटुंबीयांशी संपर्काचे ते साधन आहे पण भेटणे अगदीच शक्य नसते, तेव्हा ते वापरणे ठीक आहे. अन्यथा मानवी संवादाची जागा जेव्हा आभासी जग घेऊ लागते, तेव्हा मानसिक समस्या आणखी प्रबळ होतात. ‘कॉम्प्युटर्स इन ह्य़ूमन बिहेवियर’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.