कृष्णधवल चित्रसंचावर रंगीत काच बसवून ‘कलर टीव्ही’ पाहण्याचा काळ  स्वस्त झालेल्या टीव्ही सेट्सनी केव्हाच इतिहासजमा केला असला आणि ‘एलसीडी’च्या महाआकाराने टीव्हीवरील दृश्यानुभव अधिकाधिक सजीव केला असला, तरी टीव्ही संचाला बहुपयोगी करण्याचे प्रकार तंत्रज्ञांकडून होत आहेत. या बहुपयोगाचीच नवअवतारीत गोष्ट म्हणजे टीव्हीच्या स्क्रीनमधून आता दृश्यांसोबत त्यात असणाऱ्या वस्तूंचा, खाद्यपदार्थाचा सुगंधही अनुभवायला मिळणार आहे. उदा. स्क्रीनवरील दृश्यामध्ये ‘कॉफी’ दिसत असेल, तर तिचा गंध पाहणाऱ्याच्या घाणेंद्रियांवर व्यापू शकेल.
शोध काय?
टोकियो तंत्रज्ञान विद्यापीठाच्या हारूका मत्सुकुरा यांनी ‘स्मेलिंग स्क्रीन’ नावाचे हे तंत्र शोधून काढले आहे.  याद्वारे एलसीडी स्क्रीनमध्ये दृश्यात दिसणाऱ्या खाद्यपदार्थाचा, पेयाचा गंध त्या काळापुरता तयार होतो. हा गंध स्क्रीनच्या चारही बाजूंमध्ये शुष्क अवस्थेतील ‘जेल’द्वारे आधी भरलेला असतो. ज्या वेळी दृश्य तयार होते, तेव्हा त्या स्क्रीनमध्ये समांतर असलेले पंखे सुरू होतात आणि जेलमधून दृश्यानुरूप गंध बाहेर सोडला जातो. या स्क्रीनमधून दृश्याबरहुकूम गंध तयार होत असल्याचे ‘न्यू सायन्टिस्ट’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
भविष्य काय?
सध्या या दृश्यगंधी स्क्रीनमधून एका वेळी केवळ एकच गंध बाहेर सोडला जातो. मात्र यापुढील झेप या स्क्रीनला अधिक सक्षम बनविण्याची असेल, असे मत्सुकुरा यांनी सांगितले. कलर प्रिंटर्समध्ये ‘काट्रेज’ ज्याप्रमाणे विविधरंग आणण्यामध्ये उपयुक्त ठरतात, तशाच प्रकारची विविधगंधी यंत्रणा विकसित करण्यासाठी मत्सुकुरा प्रयत्नशील आहेत. त्यात यश मिळाल्यास टीव्ही पाहण्याचा अनुभव अधिक स्पष्ट आणि आत्ताहून पूर्णपणे वेगळा असेल. जाहिरातींमधून एखादे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही ‘स्मेलिंग स्क्रीन’ प्रणाली भविष्यात उपकारक ठरेल, असा विश्वास मत्सुकुरा यांना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा