२२ एप्रिल या दिवशी काही दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी फिरायला आलेल्या पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या गोळीबारात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश आणि संपूर्ण जग हादरलं आहे. दरम्यान स्मिता ठाकरे यांनी याबाबत आता प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादाचा खात्मा झालाच पाहिजे आणि दहशतवाद्यांनी हल्ला करुन जे आव्हान आपल्याला दिलंं आहे त्याचं उत्तर आपण द्यायला हवं असं स्मिता ठाकरे यांनी म्हटलं आहे.
स्मिता ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?
“पहलगाम हल्ल्यात ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. ज्या प्रकारे या निरपराध लोकांना मारण्यात आलं ती बाब अत्यंत निंदनीय आहे. घरातला माणूस गमावणं आणि त्यानंतरचं होणारं दुःख हे मला माहीत आहे. ज्या प्रकारे पर्यटकांची हत्या केली ती भीतीदायक आणि दुःखदायक बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही याबाबत आपल्याला आवाहन करत आहेत. प्रत्येक भारतीय हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे आधी भारतीय आहेत. ज्या प्रकारचा दहशतवाद आपल्या देशात माजवला जातो आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच सतर्क राहिलं पाहिजे. आम्हीही ठरवलं होतं की काश्मीरला जायचं, तिथे सिनेमाचं शुटिंग करायचं त्यातच ही घटना घडली. या दहशतवाद्यांनी आपल्याला एक प्रकारे आव्हान दिलं आहे. त्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे असं स्मिता ठाकरे म्हणाल्या.
पाकिस्तानी मुस्लिमांना त्यांच्या देशात धाडा-स्मिता ठाकरे
स्मिता ठाकरे पुढे म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, अमित शाह यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. तसंच पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचं काम केलं आहे. अमेरिकेनेही आपल्याला पाठिंबा दिला आहे. मात्र प्रश्न हा नाही की आपल्याला कुणी पाठिंबा दिला. आपले भारतीय लवकर गोष्टी विसरतो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबातले आहोत. त्यांनी कायम हेच म्हटलं होतं भारतीय मुस्लिम हा आपला आहे. पण भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा फडकवत असाल आणि त्यांची वाहवा करत असाल तर ते भारतीय पाकिस्तानी आहेत. जे सच्चे मुस्लिम आहेत ते सनातन मानतात.
काही राजकारणी तरुणांना चिथावणी देतात-स्मिता ठाकरे
काश्मीरमधले मुस्लिमही सच्चे मुस्लिम आहेत. लोकांना चिथावणी काही राजकारणी देतात. दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि तरुणांची माथी भडकवण्यात येतात ते योग्य नाही. हे होऊ नये म्हणून आपण एकत्र येणं आवश्यक आहे. काश्मीर भारताचा एक भाग आहे. मी तिथल्या मुख्यमंत्र्यांनाही हे सांगू इच्छिते की तुम्हालाही दहशतवाद संपवावा लागेल. जो पाकिस्तानी मुस्लिम भारतात दिसतो आहे त्याला त्याच्या देशात धाडा. अशा दहशतवाद्यांचा खात्मा जास्त आवश्यक आहे. आपले नागरिक होरपळत आहेत. काश्मीर आपलं आहे, काश्मीरचा आनंद आपल्याला घेता आलाच पाहिजे.” असंही स्मिता ठाकरे म्हणाल्या.