गेल्या पंधरा वर्षांपासून दिल्लीवर एकछत्री वर्चस्व गाजविणाऱ्या काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना शह देण्यासाठी भाजपकडून दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय उपाध्यक्ष व छोटय़ा पडद्यावरील ‘बहू’ स्मृती इराणी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. अर्थात, मतभेदांनी पोखरलेल्या भाजपमध्ये स्मृती इराणी यांच्या उमेदवारीला बळ मिळणे वाटते तेवढे सोपे नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तत्कालीन मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांच्या भाजपची सत्ता संपुष्टात आणून १९९८ पासून मुख्यमंत्री असलेल्या शीला दीक्षित यांची दिल्लीच्या राजकारणावर तसेच प्रशासनावर चांगलीच पकड आहे. ३७ वर्षीय स्मृती इराणी यांच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या शीला दीक्षित यांनी दिल्लीतील सर्वच समाजातील लोकांना आकृष्ट केले असून पंधरा वर्षांतील कामाच्या जोरावर त्यांना सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे शीला दीक्षित यांच्या तोडीचा भाजपपाशी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारच नाही. राजनाथ सिंह राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर दिल्ली प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्यात शीला दीक्षित यांना टक्कर देण्याची कुवत नसल्याचे भाजपमध्येच मानले जाते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते ८२ वर्षीय विजयकुमार मल्होत्रा यांचीही राजकीय सद्दी संपलेली आहे. विजयेंद्र गुप्ता, डॉ. हर्षवर्धन हे माजी प्रदेशाध्यक्ष शीला दीक्षित यांच्याविरोधात निष्प्रभ ठरले आहेत. दिल्लीत भाजपपाशी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची वानवा असल्यामुळे स्मृती इराणी यांचे नाव पुढे आले असून त्यांच्या नावाला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचेही समर्थन मिळण्याची पूर्ण शक्यता असल्याचे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने चढता राजकीय आलेख असलेल्या स्मृती इराणीही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार होण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. त्यांनी याबाबत भाजपमधील काही महत्त्वाच्या नेत्यांशी बोलून चाचपणीही सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्लीत जन्मलेल्याा स्मृती इराणी यांचा दिल्लीशी असलेला राजकीय संबंध तसा नवा नाही. नऊ वर्षांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर स्मृती इराणी यांना चांदणी चौक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कपिल सिब्बल यांच्याविरुद्ध उतरविण्यात आले होते. पण त्या वेळी स्मृती इराणी यांना ७९ हजारांहून अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य, राष्ट्रीय सचिव, राज्यसभा सदस्य, महिला मोर्चाच्या अध्यक्ष आणि आता राष्ट्रीय उपाध्यक्षपद अशा चढत्या क्रमाने त्यांची संपूर्ण राजकीय वाटचाल दिल्लीतच झाली.  स्मृती इराणी यांचे प्रभावी वक्तृत्व आणि राजकीय परिपक्वतेचे दिल्लीतील भाजप वर्तुळात नेहमीच कौतुक होत असते. भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी दिली तर यंदा दिवाळीनंतर होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत शीला दीक्षित यांना तुल्यबळ लढतीला सामोरे जावे लागेल, असे इराणी यांच्या समर्थकांना वाटते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani candidate for delhi chief minister