पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीवेळी दिलेली बहुतांश आश्वासने केवळ तोंडाची वाफ असल्याची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या टीकेला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोनिया गांधी स्वत:चे अपयश झाकण्यासाठी मोदींवर टीका करतात, असे स्मृती इराणी म्हणाल्या. ज्यांनी इतकी वर्षे सत्तेत असताना केवळ देशाच्या तिजोरीला रिकामी करण्याचे काम केले तेच आज देशाला विकासाची दिशा दाखवणाऱया पंतप्रधानांवर टीका करण्याचे काम करीत आहेत. हे अतिशय हास्यास्पद आहे, असेही स्मृती इराणी म्हणाल्या.
तोंडाची वाफ असल्याची टीका करणाऱयांनी सत्तेत असताना ‘वन रँक, वन पेंशन’ योजना आर्थिक कारणास्तव सुरू करणे शक्य नसल्याचे जाहीर केले होते. उलट, मोदींनी सत्तेत आल्यानंतर ही योजना लागू करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे आश्वासन देऊन त्यादृष्टीने प्रयत्न देखील सुरू केलेत. त्यामुळे तोंडाची वाफ कोणी केली आणि कोण आश्वासनांची पूर्ती करीत आहे, हे देशातील जनतेला स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सोनियांनी मोदींवर टीका केली यावर आम्हाला काहीच आक्षेप नाही. त्यांनी ती करीत राहावी कारण, जेव्हा जेव्हा सोनिया गांधी मोदींवर टीका करतात तेव्हा देशातील जनता नेहमी मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, असेही त्या पुढे म्हणाल्या.