केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत केलेले भाषण निखालस खोटे होते, असा हल्ला हैदराबाद मध्यवर्ती विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुला या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आणि मित्र यांनी शुक्रवारी चढवला.
स्मृतीजी, ही टीव्हीवरील मालिका नसून प्रत्यक्ष जीवन आहे. तुम्ही वस्तुस्थिती सांगा, गोष्टी रचून सांगू नका, असे रोहितची आई राधिका वेमुला हिने दिल्ली येथे सांगितले. रोहितचा भाऊ व त्याचे मित्र या वेळी हजर होते.
रोहितच्या मृत्यूचे राजकारण करण्यात येत असल्याचे स्मृती इराणी यांनी बुधवारी संसदेतील भाषणात सांगितले होते. मात्र भाजपला अडचणीत आणणाऱ्या या मुद्दय़ावरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी त्या खोटे बोलल्याचे रोहितचा भाऊ राजा म्हणाला.
आत्महत्येच्या काही दिवस आधी रोहितने विद्यापीठाला लिहिलेल्या पत्रात आपल्याविरुद्ध पक्षपात होत असल्याचे सांगून आपल्यासाठी ‘विष’ मागितले होते. या पत्राबाबत मंत्री जाणूनबुजून बोलत नसल्याचा आरोप रोहितच्या कुटुंबीयांनी केला.