केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोघेही आज अमेठीत आहेत. अमेठी हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ होता मात्र २०१९ च्या निवडणुकीत स्मृती इराणी या मतदारसंघातून उभ्या राहिल्या आणि त्यांनी राहुल गांधींना हरवलं. राहुल गांधी या जागेवरुन तीनवेळा खासदार झाले होते. तर सोनिया गांधीही याच जागेवरुन खासदार झाल्या होत्या. मात्र हा मतदारसंघ त्यांच्याकडून हिरावण्याचं काम स्मृती इराणींनी करुन दाखवलं.त्यानंतर आता राहुल गांधी स्मृती ईराणी हे दोघेही आज अमेठीत आहेत.
काय आहे दोघांच्या कार्यक्रमांचं औचित्य?
स्मृती इराणी या एका कार्यक्रमासाठी अमेठीत पोहचणार आहेत. तर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज अमेठीत दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पोहचणार आहे. दीर्घकाळाने हे दोन नेते अमेठीत असणार आहेत. मात्र या दोघांचा आमना-सामना थेट होणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दोघांच्याही दौऱ्याचे मार्ग वेगवेगळे आहेत.
स्मृती इराणी चार दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर
२०१९ च्या पराभवानंतर राहुल गांधी क्वचितच अमेठीला येतात. मात्र स्मृती इराणी या अनेकदा अमेठीत येऊन गेल्या आहेत. आजही त्या अमेठीत असणार आहेत. त्याचप्रमाणे राहुल गांधीही असणार आहेत. स्मृती इराणी या चार दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत. स्थानिक लोकांना त्या भेटणार आहेत. त्यांच्या एका जवळच्या विश्वासू नेत्याने ही माहितीही दिली आहे की स्मृती इराणी या २२ तारखेला नव्या घरात प्रवेश करणार आहेत. त्याचीही तयारी त्यांनी सुरु केली आहे. २२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या नव्या घराची वास्तू शांत होणार आहे.
हे पण वाचा- “ज्यांची ओळख अन्यायासाठी ते आता न्यायासाठी ढोंग..”, स्मृती इराणींची राहुल गांधींच्या ‘भारत न्याय यात्रे’वर टीका
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीतल्या गौरीगंज भागात मेदन मेवई या ठिकाणी घर बांधलं आहे. २२ फेब्रुवारीला वास्तूशांत पूजा असणार आहे. सकाळी १० वाजता पूजा सुरु होईल आणि त्यानंतर निमंत्रितांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्मृती इराणी यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक अमेठीतून जिंकली होती. त्यानंतर त्यांनी आपण इथे घर बांधणार असल्याचं आश्वासन अमेठीच्या लोकांना दिलं होतं. त्यानुसार ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं आहे. लोकांना दिलेलं आश्वासन हा एकच उद्देश स्मृती इराणींचा नाही. त्या घर बांधून हा संदेशही देऊ इच्छितात की राहुल गांधी यांना अमेठीच्या लोकांशी काही घेणंदेणं नाही फक्त मतांसाठीच ते इथे येतात.