काँग्रेसला साठ वर्षांच्या राजवटीत ज्या आश्वासनांची पूर्तता करता आली नाही पण आम्ही दिलेली बहुतांश आश्वासने भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने एक वर्षांत पूर्ण केली असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अनेक आश्वासनांची पूर्तता केल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, केरळात आयआयटी सुरू करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते पण त्याची पूर्तता केली नाही पण भाजप सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पात केरळ आयआयटीचे आश्वासन पूर्ण केले. गेल्याच आठवडय़ात पलक्कड येथे आयआयटी सुरू झाले आहे. स्थानिक खासदार व माजी मनुष्यबळ विकास मंत्री शशी थरूर यांच्यावर टीकेची झोड उठवताना त्या म्हणाल्या की, काँग्रेसच्या मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी जे केले नाही ते आपण केरळसाठी वर्षभरात केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या स्थापनेसाठी विधेयक संमत केले आहे, ते काँग्रेसच्या राजवटीत पडून होते. मुली व मुले यांच्यासाठी वेगळी प्रसाधनगृहे शाळांमध्ये बांधली आहेत. आमच्या सरकारची कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी सांगतीलच. आम्ही जनधन योजना सुरू केली व त्यात २०७०० कोटी रुपये जमा झाले. देशातील ९९ टक्के लोकांना या कार्यक्रमात सामावून घेतले आहे, जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नव्हते.