तयार वस्त्रांच्या अनेक दुकानांमध्ये महिलांना कपडे बदलण्यासाठी असलेल्या खोल्यांत (चेंजिंग रूम) छुपे कॅमेरे बसवलेले असतात, याची समाजमाध्यमांमधून अनेकांना माहिती आहे. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या सतर्कतेमुळे गोव्यात शुक्रवारी असाच प्रकार उघडकीला आल्यानंतर पोलिसांनी दुकानाच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सध्या गोव्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री या पणजीनजीकच्या कलंगुटजवळ कांदोळी गावात असलेल्या ‘फॅबइंडिया’च्या नामांकित वस्त्रप्रावरणांच्या दुकानात (आऊटलेट) खरेदीसाठी गेल्या होत्या. हे कपडे घालून पाहण्यासाठी त्या ‘ट्रायल रूम’मध्ये गेल्या असता तेथे एक छुपा कॅमेरा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याबरोबर त्यांनी त्यांचे उद्योजक पती झुबिन इराणी यांना याची कल्पना दिली, असे पोलीस अधीक्षक उमेश गांवकर यांनी सांगितले.
स्मृती यांनी यानंतर भाजपचे स्थानिक आमदार मायकेल लोबो यांना बोलावून घेतले व त्यांनी या घटनेबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. ‘आम्ही हा कॅमेरा सुरू केला, तेव्हा संपूर्ण व्हिडीओचे चित्रीकरण झाले.. हा खोडसाळपणा आहे.. कुणी तरी हे चित्राकरण पाहात होते,’ असे लोबो म्हणाले.
दुकानातील कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार, चार महिन्यांपूर्वी बसवलेल्या या कॅमेऱ्यातील फुटेज व्यवस्थापकाच्या कार्यालयात असलेल्या एका संगणकात रेकॉर्ड होत होते. यापूर्वी ‘ट्रायल रूम’मधील अनेकांचे रेकॉर्डिग संगणकात आढळून आल्याचेही लोबो यांनी सांगितले. लोबो यांच्या तक्रारीच्या आधारे कलंगुट पोलिसांनी या शोरूमची तपासणी केली असता त्यांना खोलीच्या वायुवीजन एककात सीसी टीव्ही कॅमेरा बसवलेला आढळला.
पोलिसांनी या दुकानाला सील लावले असून ते संपूर्ण शोरूमची तपासणी करत आहेत. या प्रकाराचा फटका बसलेल्या इराणी यांचे बयाण पोलिसांनी नोंदवले असून, या कॅमेऱ्यांची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध खासगी जीवनात हस्तक्षेप केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
स्मृती इराणींच्या सतर्कतेमुळे गोव्यात‘ट्रायल रूम’मधील छुप्या कॅमेऱ्याचा शोध
तयार वस्त्रांच्या अनेक दुकानांमध्ये महिलांना कपडे बदलण्यासाठी असलेल्या खोल्यांत (चेंजिंग रूम) छुपे कॅमेरे बसवलेले असतात, याची समाजमाध्यमांमधून अनेकांना माहिती आहे.
First published on: 04-04-2015 at 02:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani spots camera recording her while changing clothes in goa fir filed