जेएनयू आंदोलन आणि रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणांचे संसदेत तीव्र पडसाद
जेएनयूमधील आंदोलन आणि दलित विद्यार्थी रोहति वेमुलाची आत्महत्या या प्रकरणांचे तीव्र पडसाद बुधवारी संसदेत उमटले. या दोन्ही प्रश्नांवर संसदेत चर्चेच्या वेळी विरोधकांनी सरकारवर जळजळीत टीका केली. सरकार देशातील युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असून लोकशाहीची तत्त्वे निर्दयपण चिरडून टाकीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भाजपने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले.
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या समर्थनासाठी उभे राहणाऱ्यांना पाठिंबा दिल्याबद्दल भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली. संसदेवर ज्यांनी हल्ला केला त्यांच्या पाठीशी उभे राहणार की संसदेचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी प्राणांची बाजी लावली त्यांच्या पाठीशी उभे राहणार या बाबत सभागृहानेच निर्णय घ्यावा, असे भाजपने म्हटले आहे.
संसदेच्या अधिवेशनातील कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सत्तारूढ आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आणि आपणच देशभक्त असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
चर्चेला सुरूवात करताना काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रेय यांच्यावर आरोप केला. हे दोन्ही मंत्री वेमुला प्रकरणात विनाकारण हस्तक्षेप करीत असल्याचे शिंदे म्हणाले. बंडारू दत्तात्रेय यांनी रोहित वेमुला जातीयवादी आणि देशविरोधी असल्याचे आपल्या पत्रात नमूद केले होते. मनुष्यबळ विकासमंत्री एखाद्या प्रकरणात पाच पत्रे लिहित असल्याचा प्रकार आपण जगात कोठे पाहिला आहे का, असा सवाल शिंदे यांनी केला.
एफटीआयआय, आयआयटी मद्रास आणि जेएनयूचे प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केले. सरकार देशातील युवकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित वेमुला दलित नव्हता असे सांगणाऱ्या केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, ज्युएल ओराम आणि स्मृती इराणी यांच्यावर शिंदे यांनी हल्ला चढविला. हैदराबाद विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर टीका करताना शिंदे म्हणाले की, निदर्शने आणि लढाई हा शैक्षणिक संस्थांचा एक भाग आहे, मात्र हे प्रकरण कुलगुरूंनी उत्तम मार्गाने हाताळण्यास हवे होते, मात्र त्यांनी दलित विद्यार्थ्यांना निलंबित केले आणि संघ परिवार आणि भाजपच्या राजकारणामुळे त्यांना तंबूत उघडय़ावर वास्तव्य करणे भाग पडले, असेही शिंदे म्हणाले.
या बाबत अधिक हल्ला चढविताना शिंदे यांनी, सरकारचे कर्तव्य कोणते, असा सवाल केला. लोकशाही संस्थांचे रक्षण करून जनतेच्या उद्धारासाठी काम करणे हे सरकारचे काम आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून असहिष्णुतेचे वातावरण असल्याने कोणालाही सुरक्षित वाटत नाही, सरकार निर्दयपणे लोकशाही तत्त्वे चिरडून टाकत आहे, असे शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांबद्दल भाष्य करतात, पण देशात काय सुरू आहे. याचा त्यांना विसर पडला आहे, असेही ते म्हणाले.

स्मृती इराणी आणि मायावती यांच्यात खटके
दलित विद्यार्थी रोहिल वेमुलाच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून बसपाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातल्याने राज्यसभेत बुधवारी कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. या वेळी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्यात जोरदार खटके उडाले. आपण सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत तरीही बसपाच्या नेत्यांचे समाधान झाले नाही तर आपण स्वत:चा शिरच्छेद करून तुमच्या पायावर ते अर्पण करण्यास तयार आहोत, असे इराणी म्हणाल्या.