केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या ताफ्यातील गाडीच्या धडकेमुळे माझ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याचा त्यांच्या मुलीचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी फेटाळला. यमुना द्रुतगती मार्गावर डॉक्टर कुटुंबीयांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर सात ते आठ मिनिटांनी स्मृती इराणी यांच्या गाड्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला, असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस अधीक्षक राकेश यादव यांनीच ही माहिती दिली.
ते म्हणाले, यमुना द्रुतगती मार्गावर स्मृती इराणी यांच्या गाड्यांचा ताफा पोहोचण्यापूर्वीच तिथे आधी एक अपघात झाला होता. या अपघातात एक जण मृत पावले तर अन्य दोघे जण जखमी झाले. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांना स्मृती इराणींच्या ताफ्यातील गाडी धडकली. द्रुतगती मार्गावर आधी झालेल्या अपघाताचा आणि स्मृती इराणी यांच्या गाड्यांच्या ताफ्याचा काहीही संबंध नाही.
दरम्यान, या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी स्मृती इराणी आम्हाला जखमी अवस्थेतच घटनास्थळी टाकून गेल्याचा आरोप केला आहे. मृत व्यक्ती आग्रास्थित डॉक्टर असून अपघातावेळी गाडीत त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी आणि पुतण्या होता. स्मृती इराणी यांच्या गाड्यांचा ताफा आमच्या कारवर येऊन आदळला. त्यावेळी मी जखमी अवस्थेत गाडीच्या बाहेर येऊन इराणींकडे मदतीची याचना केली. मात्र, स्मृती इराणी यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्या तशाच अवस्थेत आम्हाला टाकून निघून गेल्या, असे मृत व्यक्तीच्या मुलीने सांगितले. याप्रकरणी स्मृती इराणी यांच्या गाडीच्या चालकाविरोधात आग्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचेही वृत्त आहे. माझी बहीण जखमी अवस्थेत स्मृती इराणी यांच्याकडे अक्षरश: मदतीची भीक मागत होती. मात्र, त्या तिला मदत न करताच निघून गेल्याचे या मुलीच्या भावाने सांगितले.
स्मृती इराणी शनिवारी वृंदावन येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रम आटोपून दिल्लीला जाताना हा अपघात झाला. अपघातात तीन सुरक्षा रक्षक तसेच चालक जखमी झाले. यामध्ये स्मृती इराणींच्या गुडघ्याला जखम झाली.