दिल्लीचे माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांच्याप्रमाणे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे तपासण्यात यावीत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाऊ प्रल्हाद मोदी यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या भावानेच अशी मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गाझियाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ज्याप्रमाणे आम आदमी पक्षाचे आमदार जितेंद्र सिंह तोमर यांच्या पदवी प्रमाणपत्रांची कागदपत्रे तपासण्यात आली. त्याचप्रमाणे स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेची देखील चौकशी करण्यात यावी.
स्मृती इराणी यांची शैक्षणिक पात्रतेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून करण्यात येते आहे. आता खुद्द प्रल्हाद मोदी यांनीच त्याचे समर्थन केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकार पुढील अडचणीत वाढ झाली आहे.