यंदाचा शिक्षक दिन पंतप्रधानांचे भाषण शाळांमधून मुलांना ऐकवण्याची अघोषित सक्ती व त्यानिमित्ताने गुरू उत्सव म्हणून निबंध स्पर्धा घेण्याची नवीनच टूम, यामुळे चांगलाच गाजू लागला आहे. विरोधी काँग्रेस, एमडीएमके व पीएमके या पक्षांनी या मुद्दय़ावर सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी विरोधकांची प्रतिक्रिया खेदकारक असल्याचे सांगितले आहे. मुलांना पंतप्रधानांच्या या कार्यक्रमातील सहभागाची सक्ती केलेली नाही असे स्पष्ट केले.
पंतप्रधानांचे भाषण मुलांना ऐकवणे म्हणजे नवा पॅकेजिंग करण्याचा प्रकार आहे, असा आरोप काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला आह़े तामिळनाडूतील भाजपचे मित्र पक्ष असलेला द्रमुक व पीएमके यांनी हा कार्यक्रम म्हणजे संस्कृत भाषा लादण्याचा प्रकार आहे असे म्हटले आहे. पीएमके नेते एस. रामदास व एमडीएमके नेते वैको यांनी केंद्र सरकारला शिक्षक दिन गुरू उत्सव नावाने साजरा करण्याचा प्रस्ताव मागे घेण्यास सांगितले आहे. द्रमुकचे नेते करूणानिधी यांनी अगोदरच हा तामिळभाषेला कमी लेखण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. स्मृती इराणी दिवसभरात दोनदा प्रसारमाध्यमांना भेटल्या त्यांनी या आरोपांचे खंडन केले आह़े सरकारने शिक्षक दिनाचे नामकरण गुरू उत्सव असे केलेले नाही. केवळ या दिवशी गुरू उत्सव या नावाने निबंध स्पर्धा ठेवली आहे. जर शिक्षकांना गुरू म्हणण्यास आक्षेप असेल तर ते खेदजनक आहे. जर शिक्षकांवर निबंध स्पर्धा घेतल्याने विरोध होणार असेल तर त्याचा अर्थ आपल्याला गुरूंविषयी आदर नाही असा होतो, असा प्रतिहल्लाही स्मृती इराणी विरोधकांवर केला़

Story img Loader