नागदेवतेचा आशीर्वाद घेण्याच्या अंधश्रद्धेपायी एका कुटुंबाने आपले पाच महिन्यांचे मूल गमावले. छत्तीसगडच्या राजनंदगाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. आई-वडिलांनी आपली पाच महिन्यांची मुलगी नागदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी गारुडयाकडे सोपवली. त्याचवेळी कोब्रा जातीच्या या सापाने मुलीला दंश केला. सापाचे विष अंगात भिनतेय हे ठाऊक असतानाही त्या गारुडयाने हे विष नाहीय असे सांगून तब्बल दोन तास विधी चालू ठेवले.

या मुलीचा श्वासोश्वास हळूहळू कमी कमी होत गेला. पालक तिला रुग्णालयात घेऊन गेले पण तो पर्यंत खूप उशीर झालेला होता. राजनंदगाव जिल्ह्यात रहाणाऱ्या या कुटुंबाच्या दरवाजावर बिल्लू राम मारकाम हा गारुडी आला. नागदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मुलीला माझ्याकडे द्या असे त्याने सांगितले. मुलीची तब्येत ठिक नसल्याने तिच्या आई-वडिलांनी आशीर्वादासाठी म्हणून आपले मूल त्याच्याकडे सोपवले.

बिल्लूने साप त्या मुलीच्या गळयाभोवती गुंडाळल्यानंतर कुटुंबियांनाही धक्का बसला. पण आंधळा विश्वास असल्याने ते काही बोलले नाहीत. अखेरीस या सापाने मुलीला दंश केला. अंगात विष भिनतेय हे ठाऊक असूनही गारुडयाने चिंता करु नका असे सांगून आपले विधी चालूच ठेवले. अखेरीस या मुलीचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी बिल्लूला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Story img Loader