‘एअर इंडिया एक्स्प्रेस’च्या विमानात साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळातील कालीकत येथून या विमानाने उड्डाण केलं होतं. हे विमान दुबईला उतरताच त्यामध्ये साप आढळला आहे. विमानात अशा प्रकारे साप दिसल्यानंतर विमानातील प्रवाशी घाबरले.
सुदैवाची बाब म्हणजे हा साप कार्गो होल्डमध्ये आढळला आहे. याठिकाणी प्रवाशांचं सामान होतं. विमानात साप आढळल्याची घटना घडताच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घटनेचा तपास सुरू केला आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. या सापाने केरळ ते दुबई असा हवाई प्रवास केला आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसचे बी-३३७-८०० हे विमान केरळमधील कालिकत येथून दुबईला पोहोचलं होतं. विमानात साप असल्याचं समजताच प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आलं. संपूर्ण घटनेची माहिती देताना डीजीसीएच्या अधिकाऱ्यानं सांगितले की, “हे विमान दुबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या कार्गो होल्डमध्ये एक साप आढळून आला. त्यानंतर विमानतळाच्या अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली.”
या विमानात नेमके किती प्रवासी होते, याची नेमकी माहिती अद्याप समोर आली नाही. निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असावा, अशी प्राथमिक माहिती समजत आहे. पण विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप नेमका कसा पोहोचला? आणि तो साप एकाही विमान कर्मचाऱ्याला कसा दिसला नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.