गुजरातमधील वास्तुरचनाकार तरुणीवर पाळत ठेवण्याप्रकरणी चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घ्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी गुरुवारी दिली. केंद्र सरकारने आयोग नेमण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत आयोगाचे सदस्य लवकर आपला अहवाल सादर करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गुजरातमधील एका वास्तुरचनाकार तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चौकशी आयोग कायद्याच्या कलम ३ अन्वये हा आयोग नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली.
गुजरातमधील या घटनेमध्ये भारतीय तार कायदा आणि माहिती-तंत्रज्ञान कायदा या दोन्हींचे उल्लंघन झाले असून, आरोपांची निश्चिती लवकर व्हायला हवी, असे त्यांनी सांगितले.