गुजरातमधील युवतीवर पाळत प्रकरणाला नवे वळण मिळाले असून गुजरात पोलिसांनी आता या प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शहा यांच्याविरोधात प्राथमिक अन्वेषण अहवाल (एफआयआर) दाखल करण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाळतप्रकरणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी निलंबीत आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा अहमदाबाद पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. यावर तक्रार दाखल न केल्यास न्यायालयात जाणार असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
प्रदिप शर्मा देखील या प्रकरणाशी गुंतलेले आहेत आणि गुजरात सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढा देत आहेत. त्यांनी कोब्रापोस्ट आणि गुलेल डॉटकॉम या संकेतस्थळांनी प्रसारित केलेल्या या प्रकरणाच्या ऑडिओ टेप्सची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या टेप्समधून गुजरातमधील एका वास्तुरचनाकार युवतीवर गुजरात पोलिसांच्या माध्यमातून अमित शहा आपल्या ‘साहेबां’च्या आदेशानुसार पाळत ठेवण्यास सांगत असल्याचे ध्वनीमुद्रीत झालेले आहे. यावरून गुजरामध्ये शासकीय सेवेचा दुरूपयोग झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

Story img Loader