पीटीआय, डेहराडून : उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर परिसरात शनिवारी सकाळी हिमस्खलन झाल्याने भाविकांत घबराट पसरली होती. मात्र, चिंता करण्याचे कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले, की सकाळी साडेसहाला ‘केदार डोम’ आणि ‘स्वर्गरोहिणी’ दरम्यान एक हिमनग तुटून केदारनाथ मंदिराच्या मागे असलेल्या चोराबाडमी तलावात कोसळला. तीन-चार मिनिटे तलावाच्या पाण्यावर बर्फाचे ढिगारे तरंगले. मंदिराच्या मागे हिमस्खलन झाल्याने भक्तांमध्ये भीती पसरली. या घटनेने २०१३ च्या केदारनाथ पुराच्या विध्वंसकारी पुराची आठवण झाली. मात्र, या हिमनगांमुळे मंदाकिनी आणि सरस्वती नद्यांची पातळी वाढली नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे अजय यांनी सांगितले. प्रशासन, मंदिर समिती, गढवाल मंडल विकास महामंडळ आणि राज्य आपत्ती निवारण कक्षाचे पथक सतत पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहेत. मंदिरापासून खूप दूर ही घटना घडली आहे. केदारपुरी वस्तीवर त्याचा परिणाम झालेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा