श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील अधिकांश भागात हिमवृष्टी झाल्याने शनिवारी जनजीवन विस्कळीत झाले. अधिकांश भागात हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वेसेवाही ठप्प झाली होती तर जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद झाला. शुक्रवारी खोऱ्यात मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर व प्रसिद्ध पर्यटनस्थळ सोनमर्गमध्ये प्रत्येकी आठ इंच तर गांदरबलमध्ये सात, श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावरील जोजीला येथे १५ तर अनंतनाग जिल्ह्यातील मैदानी भागात १७ इंच हिमवृष्टी झाल्याची नोंद झाली.
परीक्षा पुढे ढकलल्या
हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला तर रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यामुळे बनिहाल – बारामुला मार्गावर रेल्वे वाहतूकही ठप्प झाली होती. हिमवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. यासोबतच खोऱ्यातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला होता. राज्यातील स्थितीचा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही आढावा घेतला. दरम्यान काश्मीर विद्यापीठानेही सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
हेही वाचा >>> ‘डल्लेवाल यांच्या उपचारांना विरोध कशासाठी?’ वैद्याकीय मदतीस विरोध करणारे हितचिंतक नसल्याची न्यायालयाची टिप्पणी
उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीसह पावसामुळे थंडीत वाढ
देहरादून : उत्तराखंडमध्ये मैदानी भागासह शिखरांवरही हिमवृष्टी आणि पावसामुळे राज्यातील थंडीत वाढ झाली आहे. यासोबतच हिमालयीन मंदिरांकडे जाणारे महामार्गही अनेक ठिकाणी बंद राहिले. औली, हर्षिल, हेमकुंड साहिब, चोपता, दयारा, लोखंडी, सुक्की टॉप, मुनस्यारी आणि पिथौरागढवर बर्फाची चादर पसरल्याचे दृश्य आहे.
पर्यटकांना मशिदीत आश्रय
श्रीनगर-सोनमर्ग राष्ट्रीय महामार्गावरील गुंड येथील स्थानिक नागरिकांनी हिमवृष्टीत अडकलेल्या पर्यटकांना मशिदीत आश्रय दिला. पंजाबच्या पर्यटकांचे वाहन हिमवृष्टीमुळे अडकून पडले होते. त्या वेळी जवळपास एकही हॉटेल अथवा राहण्याची व्यवस्थाही नव्हती. याची माहिती मिळताच स्थानिकांनी जामिया मशिदीचे दार पर्यटकांसाठी उघडले. त्यामुळे पर्यटकांना रात्रभर येथे आश्रय घेता आला. नागरिकांनी केलेल्या आदरातिथ्यामुळे सर्व पर्यटक भारावले होते. दरम्यान, ‘हा सर्वोत्तम उपाय होता कारण मशिदीत ‘हमाम’ (स्नानगृह) आहे, जो रात्रभर गरम राहतो’ असे पर्यटक बशीरने सांगितले.