श्रीनगर : काश्मीरमध्ये नवीन वर्षांची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली. गुलमर्ग आणि पहलगाममध्ये या मोसमातील आतापर्यंतची सर्वात थंड रात्र नोंदवली गेली.
अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले, की दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे उणे ९.४ अंश सेल्सियस किमान तापमान नोंदवले गेले, जे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येथील रिसॉर्ट जम्मू-काश्मीरमधील सर्वात थंड ठिकाण ठरले. गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे ८.२ अंश सेल्सियस होते. श्रीनगरमधील तापमान सलग दोन रात्री गोठणिबदूच्या वर राहिले. शहरातील तापमान ०.५ अंश सेल्सियस होते. काझीगुंडमध्येही काल रात्री तापमान गोठणिबदूच्या वर राहिले. येथे किमान तापमान ०.३ अंश सेल्सियस नोंदवले गेले. कूपवाडा येथे किमान तापमान उणे ४.५ अंश सेल्सियस होते, तर दक्षिण काश्मीरमधील कोकरनागमध्ये ते उणे ०.५ अंश सेल्सिअस होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी खोऱ्यातील बहुतांश भागात बर्फवृष्टी झाली होती.