Delhi Police Arrested Medha Patkar: दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरोधात बुधवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यानुसार आज त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून साकेत न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
२००० साली दाखल झाला होता गुन्हा
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर त्यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनासाठी ओळखल्या जातात. २००० साली त्यांच्याविरोधात दिल्लीत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली असता त्यावर न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यानुसार आज दिल्ली पोलिसांनी मेधा पाटकर यांना अटक केली आहे.
अटक टाळण्याचा अर्ज फेटाळला
दरम्यान, बुधवारी मेधा पाटकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्यावरील अटकेची कारवाई किमान दोन आठवड्यांसाठी स्थगित करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. प्रोबेशन बाँडसंदर्भातदेखील याचिकेत उल्लेख करण्यात आला होता. न्यायालयाने मेधा पाटकर यांना मंगळवारी यासंदर्भात सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रोबेशन बाँड सादर करण्यात मेधा पाटकर यांना अपयश आल्यामुळे त्यांच्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
२५ नोव्हेंबर २००० रोजी मेधा पाटकर यांनी यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली होती. सक्सेना हे एका बाजूला नर्मदा बचाओ आंदोलनाला समर्थन देत असताना दुसरीकडे त्यांची स्वयंसेवी संस्था गुजरात सरकारच्या सरदार सरोवर प्रकल्पाला पाठिंबा देत असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. नर्मदा बचाओ आंदोलन समिती या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करत होती. याशिवाय, सक्सेना यांनी नर्मदा बचाओ आंदोलन समितीला देणगीदाखल दिलेला चेकदेखील बाऊन्स झाला, असा आरोप मेधा पाटकर यांनी केला होता.
पाच महिने तुरुंगवासाची शिक्षा
दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात मॅजिस्ट्रेट कोर्टानं मेधा पाटकर यांना अवमान याचिकेप्रकरणी दोषी मानलं होतं. तसेच, १ जुलै रोजी त्यांना पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, २९ जुलै २०२४ रोजी त्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायालयाने रद्द केली व त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.